मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्या, तरी अनेकांना सोयीनुसार ‘वेटिंग’वर ठेवले जात आहे. बदल्यांचा तिसऱ्या लॉटनंतर अद्यापही दोन वरिष्ठ आयपीएससह सहा अधिकाऱ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महासंचालकाच्या अखत्यारीतील उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या बदल्या कधी केल्या जातात, याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.बदली झालेले अप्पर महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष महानिरीक्षक कैसर खालिद, तसेच चार मपोसे अधिकारीही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोनामुळे सुरुवातीला या वर्षीच्या सर्वसाधारण बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर, जुलैमध्ये बदल्या करण्याबाबत मंजुरी मिळाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बदल्यांबाबत एकमत होणे, डीजींचे मत यामुळे पहिली यादी जारी करण्यास २ सप्टेंबर उजाडला. त्यानंतर, ३० सप्टेंबरला मध्यरात्री ४३ आयपीएस व १०७ उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. मात्र, उर्वरित दर्जाच्या जवळपास तितक्याच बदल्या शिल्लक आहेत. त्यामुळे बदल्यांसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. सलग चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली.