मेट्रो स्थानकांवर सहा पादचारी पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:16 PM2023-10-10T14:16:35+5:302023-10-10T14:17:44+5:30
एकूण ८८२ मी. लांब हे पूल असणार असून, पूर्व व पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या अंधेरी-मानखुर्द मेट्रो १ आणि २ ब मार्गिकेतील स्थानकांवर या पुलांची उभारणी होणार आहे.
मुंबई : एमएमआरडीए परिसरात मेट्रो उभारली जात आहे. या मेट्रो स्थानकात प्रवाशांना पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएकडून सहा पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. एकूण ८८२ मी. लांब हे पूल असणार असून, पूर्व व पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या अंधेरी-मानखुर्द मेट्रो १ आणि २ ब मार्गिकेतील स्थानकांवर या पुलांची उभारणी होणार आहे.
येथे पूल उभारणार -
ईएसआयसीनगर ते जेव्हीपीडी बस डेपो, प्रेमनगर ते कूपर रुग्णालय, नॅशनल कॉलेज ते बीडीटीएस, कुर्ला पूर्व ते कुर्ला उपनगरीय स्थानक व लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर ते मोनोरेल स्थानक आणि मानखुर्द ते मानखुर्द उपनगरीय स्थानक या पुलांचा त्यात समावेश आहे.
कुर्ल्यातील पूल -
मेट्रो २ ब मार्गिकेच्या पूर्वीच्या आराखड्यात ही मार्गिका कुर्ला रेल्वे स्थानकाला जोडली जाणार होती. मेट्रोचे स्थानक आणि कुर्ला रेल्वे स्थानक जोडण्यासाठी उभारण्यात येणारा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.
पहिला टप्पा मानखुर्द ते कुर्ला -
- मुंबईचे पूर्व उपनगरातील प्रवेशद्वार मानखुर्द ते पश्चिम उपनगरातील अंधेरी दरम्यान मेट्रो २ ब मार्गिकेचे बांधकाम केले जात आहे.
- ईएसआयसीनगर जवळ ही मार्गिका मेट्रो १ व मेट्रो २ अ मार्गिकेशी संलग्न होईल. वांद्रे, कुर्ला, चेंबूरमार्गे मानखुर्द मंडाला अशी मेट्रो धावेल.
- या मार्गिकेचा पहिला टप्पा मानखुर्द ते कुर्ला पूर्व असून, तो डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू करण्यासाठी एमएमआरडीएचे प्रयत्न सुरू आहेत.
२ नोव्हेंबरपर्यंत निविदा -
या मार्गावरील स्थानकाचे काम सुरू असून, या मार्गिकेदरम्यान पादचारी पूल उभारले जाणार आहेत. एमएमआरडीएने त्यासाठी निविदा काढली आहे. त्यामध्ये संबंधित कंत्राटदाराला सहा पादचारी पुलांचा अभियांत्रिकी आराखडा तयार करून ती माहिती एमएमआरडीएकडे द्यावी लागणार आहे. इच्छुक कंत्राटदारांना २ नोव्हेंबरपर्यंत निविदा भरावी लागणार आहे.