मुंबई : एप्रिल महिन्यात मीरा रोडमधील एका बारसमोर डॉल्फिन प्रॉपर्टीचे मालक विजय प्रधान ऊर्फ बंटी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी क्राइम ब्रांचच्या कक्ष ११ने शनिवारी दुपारी सहा जणांना ताब्यात घेतले. राजेश ऊर्फ दया रमेश चव्हाण (३४), रवींद्र रमेश आर्या (३८), मुकेश शेट्टी (२९) आणि जटाशंकर पांडे ऊर्फ सनी (३०), जितेंद्र ज्वाला (३२) आणि मयांक गाला (२८) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कांदिवलीतील एका व्यावसायिकाच्या घरी चार लोक दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. हे सर्व कांदिवलीच्या सरोवर हॉटेलसमोर होते. त्याच वेळी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून या सहा जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. ज्यात एप्रिल महिन्यामध्ये प्रधान यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये या सहा जणांचा हात असल्याचे त्यांनी कबूल केले. यातील चौहान आणि शेट्टी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून चौहानवर १२ तर शेट्टीवर हत्या आणि दरोड्यासारखे दोन गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मयांक गाला याने रेकीचे काम केले असून यातील प्रमुख शूटर अद्याप फरार आहेत. या शूटर्सना फतेपूर सिक्री येथे भेटून कुख्यात अंडरवर्ड डॉन सुभाष सिंग ठाकूरने प्रधानला मारण्याची सुपारी दिली होती. त्यामुळे सध्या सहा जणांनी त्या शूटरना ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रधान आणि ठाकूर हे सुरुवातीला एकत्र काम करत होते. मात्र नंतर प्रधानने त्याचा वेगळा व्यवसाय सुरू केला. तसेच त्याने परस्पर मार्केटमधून पैसे उचलले. मात्र याबाबत ठाकूरला सांगितले नाही. तसेच वारंवार बोलावूनही प्रधान ठाकूरला भेटण्यास गेला नाही. त्यामुळे प्रधानचा काटा काढण्याचे ठाकूरने ठरविले आणि त्याची हत्या केली. (प्रतिनिधी)
गोळीबार प्रकरणी सहा जण ताब्यात
By admin | Published: September 29, 2015 1:37 AM