मुंबई : कुर्ला येथील बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या मार्केट परिसरात शुक्रवारी भरधाव टेम्पोने सहा जणांना उडविले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिकांनी टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर चिरागनगर येथील मच्छी मार्केट रोड परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
टाटा कंपनीचा छोटा टेम्पोचा चालक उत्तम बबन खरात (२५) याचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या अपघातामध्ये प्रीती पटेल (३५) या महिलेचा मृत्यू झाला. ती घाटकोपरच्या पारशीवाडीतील भागीरथी चाळीत राहण्यास होती. यामध्ये रेश्मा शेख (२३), मारूफा शेख (२७) आणि तोफा उजहर शेख (३८), मोहरम अली अब्दुल रहीम शेख (२८) आणि अरबाज शेख (२३) हे जखमी झाले आहेत.
चालक म्हणतो, फिट आली
पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत चौकशी करताच, त्याने अचानक डोळ्यांसमोर अंधारी येत फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले. तो नशेत होता की नाही हे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी नमूद केले.