Join us

जुहू बीचवर सहा जणांना जेली फिशचा चावा

By मनोहर कुंभेजकर | Published: August 14, 2023 2:20 PM

गणपती विसर्जनापर्यंत जेली फीशचा समुद्रात वावर असतो.

मुंबई - गेल्या शुक्रवारपासून जुहू बीचवर जेली फिश यायला लागले आहेत. काल आणि आज सकाळीसुद्धा भरती बरोबर येथे जेली फिश आले होते. या संदर्भात सर्वप्रथम शनिवार दि,११ ऑगस्ट रोजी लोकमत ऑनलाईनला आणि दि,१२ ऑगस्टच्या लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. दैनिक लोकमतच्या दि, २५ जुलैच्या अंकात "चला चला जेलिफिश यायची वेळ झाली" पर्यटकांना खबरदारी घेण्याचे जीवरक्षकांचे आवाहन या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द झाले होते. काल रात्री जुहू बीच वर रात्री ७.१० ते ८ दरम्यान सहा जणांना जेली फिशने चावा घेतला. त्यांनी मग विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

दिवशाद मेहता (५), मोहम्मद अदर मन्सूरी (४.३०), दिव्यांग मेहता (५), मेंटविश शेख (महिला - ६), मोहम्मद राजउल्ला (२२), अरर्थीया प्रमुह (महिला - २५)  या सहा जणांवर कूपर हॉस्पिटल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून घरी पाठवले.

गणपती विसर्जनापर्यंत जेली फीशचा समुद्रात वावर असतो. दर शनिवारी, रविवारी सुमारे २५००० पर्यटक जुहू चौपटीवर येतात. समुद्राचे आकर्षण असते, मात्र पर्यटकांनी  सूचनांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्रात उतरू नये, असे आवाहन येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी व सोहेल मुलाणी यांनी केले आहे.

कसे असतात जेली फीश -पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने जोरदार वारे वाहतात.समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेली फीश समुद्रकिनाऱ्या जवळ येतात. ब्ल्यू बॉटल जेली फीश हे  विषारी असून साधारणपणे हवा भरलेल्या निळ्या पिशवी सारखे असतात.त्यांच्या टेटॅकल्स पेशीमध्ये विषारी द्रव्य असून ते चावल्यावर असह्य वेदना होतात.पोर्तुगीज मॅन ओ वॉर या नावाने त्यांची ओळख आहे.

जेली फीश चावल्यावर असे करावेत उपचार -जेली फीशचा मानवी संपर्क झाल्यावर ते कचकचून चावतात.त्यांच्या वेदना असह्य असतात.अश्यावेळी जिकडे त्यांनी चावा घेतला आहे,तिकडे गायीचे शेण,कोलगेट पेस्ट लावणे तसेच बर्फाने चोळून लिंबू लावावे. जर जखम जास्त असल्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावून औषध व पेनकिलर इंजक्शन घ्यावे  अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :मुंबई