मुंबई - जुन्या गाजलेल्या नाटकांचे जतन करण्याच्या दृष्टिने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जुन्या नाटकांची पुर्ननिर्मिती करून त्यांचे चित्रीकरण करून जतन करण्याच्या उपक्रमास वित्तीय मान्यदा देण्याच्या विचाराधीन असलेल्या निर्णयाला शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी २८ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधत जुन्या नाटकांचे जतन करण्याचा उपक्रत हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत १९६०च्या कालखंडातील सहा नाटकांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यात 'चोरीचा मामला', 'कालचक्र', 'विठ्ठला', 'दुर्गी', 'डॉ. हुद्दार' आणि 'चिन्ह' ही जुन्या काळातील गाजलेली नाटके पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. एका नाटकासाठी ४ लाख ८० हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
यात नाटकासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश असून, तो कालखंडही उभा केला जाणार आहे. या नाटकांची निर्मिती करण्याचे काम राज्य नाट्य स्पर्धेतील जुन्या संस्थांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात हे काम होणार आहे. या माध्यमातून नवीन कलाकार आणि तंत्रज्ञांना आपले कलागुण दाखवण्यास वाव मिळणार आहे. या योजनेतील पुढील कामकाज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे सोपविण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
नाटकांचा अनमोल ठेवा जतन करण्याची तसेच चित्रीकरण झालेल्या नाटकांची देयके संबंधितांना अदा करण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकांकडे सोपवण्यात आल्याचे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.