मुंबई : महापालिकेकडून ६०० कोटींचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर बेस्टचे बसभाडे आणि मासिक बस पासाच्या दरात कपात होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गुरुवारी पालिका महासभेसमोर ठेवला जाईल. विशेष म्हणजे, यात एसी बसचे किमान भाडे सहा रुपये करण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांना अवघ्या सहा रुपयांत गारेगार प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे.प्रवासी वाढविण्याचे लक्ष्यबस भाड्यामध्ये तब्बल ६० ते ७० टक्के कपात होणार आहे. यामुळे बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात मोठी घट होईल, यासाठी प्रवासीवर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची अट पालिकेने घातली आहे. सध्या बेस्ट बसगाड्यांमधून २० लाख प्रवासी प्रवास करतात. ही संख्या दुप्पट म्हणजे ४० लाखांवर नेण्याचे आव्हान बेस्ट उपक्रमापुढे आहे.विलीनीकरणाबाबत मौनपालक संस्था असल्याने महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने अनुकूलताही दाखविली होती, परंतु याबाबत अद्याप कोणता प्रस्ताव आलेला नाही. विलीनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी पालिका प्रशासनाने आठ ते १२ महिन्यांची मुदत वाढवून मागितली असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.आदित्य ठाकरे यांच्या ‘बेस्ट’ भेटीतून निवडणुकीचे संकेत?मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगत आहे. या चर्चेला अद्याप शिवसेनेकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र, बेस्ट बसभाडे कपातीचा निर्णय मंगळवारी झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे बेस्ट भवनात अवतरले. त्यामुळे पुन्हा या चर्चेला उधाण आले आहे.बेस्ट कामगारांचा संप मिटविण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याचे श्रेय कामगार नेते शशांक राव घेऊन गेल्याने शिवसेना नेत्यांची चरफड झाली होती. त्यामुळे बसभाडे कपातीचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये मंजूर होताच, शिवसेनेने या निर्णयाचे श्रेय घेण्यास सुरुवात केली.बसचे किमान भाडे पाच रुपये करणाºया बेस्ट समितीचे अभिनंदन करण्यासाठी आदित्य ठाकरे कुलाबा येथील बेस्ट भवनात दुपारी हजर झाले. बेस्ट भवनात येण्याची ही आपली पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मात्र, विधानसभा निवडणुकीची ही तयारी समजावी का? या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.या दर कपातीला पालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर, प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाकडून त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतरच ही भाडेकपात अंमलात येईल. येत्या महिन्याभरात बस भाड्याचे नवीन दर लागू होतील.-सुरेंद्रकुमार बागडे,महाव्यस्थापक, बेस्ट
सहा रुपयांत बेस्ट देणार गारेगार प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 5:53 AM