घुसखोरीप्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक, त्यानंतर जामिनावर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:38 AM2020-09-16T01:38:47+5:302020-09-16T01:39:04+5:30
बुधवार ९ सप्टेंबर, २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र महानगर १ नामक व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी शेअर केले.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्याप्रकरणी मदन शर्मा (६५) या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी सहा शिवसैनिकांना मंगळवारी घुसखोरीप्रकरणी पुन्हा अटक केली. त्यानंतर त्यांची बोरीवली कोर्टाने प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका केली.
बुधवार ९ सप्टेंबर, २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र महानगर १ नामक व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी शेअर केले. याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांच्या अपमानानंतर चिडलेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी शर्मा यांना मारहाण केली. या प्रकरणी सहा शिवसैनिकांना शुक्रवारीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच रात्री पोलीस ठाण्यात जामीन देण्यात आला. या विरोधात स्थानिक भाजप आमदार, तसेच शर्मा यांच्या नातेवाइकांसह विरोधी पक्षनेत्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरले होते.