कार्यालयीन जागांच्या मागणीत सहा पट वाढ, अंधेरी परिसराला अधिक पसंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:55 PM2024-10-04T12:55:58+5:302024-10-04T12:56:16+5:30

एकीकडे मुंबईत घरांच्या विक्रीमध्ये वाढ होत असताना, मुंबई शहरात गेल्या आठ महिन्यांत कार्यालयांची खरेदी आणि भाड्याने कार्यालय घेणे या प्रकारामध्ये गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सहा पट वाढ

Six times increase in demand for office spaces Andheri area is more preferred! | कार्यालयीन जागांच्या मागणीत सहा पट वाढ, अंधेरी परिसराला अधिक पसंती!

कार्यालयीन जागांच्या मागणीत सहा पट वाढ, अंधेरी परिसराला अधिक पसंती!

मुंबई :

एकीकडे मुंबईत घरांच्या विक्रीमध्ये वाढ होत असताना, मुंबई शहरात गेल्या आठ महिन्यांत कार्यालयांची खरेदी आणि भाड्याने कार्यालय घेणे या प्रकारामध्ये गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सहा पट वाढ नोंदली गेली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. 

एक लाख ३० हजार चौरस फुटांवर ऑफिस
1. चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत मुंबई तब्बल एक लाख तीस हजार चौरस फूट जागांवर विविध कंपन्यांची कार्यालये थाटली गेली आहेत. विशेष म्हणजे, नरिमन पॉइंट, बीकेसी, लोअर परळ, वरळी यानंतर आता विविध कंपन्यांचा अंधेरी येथे कार्यालये सुरू करण्याचा कल अधिक असल्याचे दिसून आले आहे.
2. अंधेरीमध्ये बॉलीवूड कलाकारांनी ३०० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करून कार्यालयांची खरेदी केली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान बँकिंग व वित्तीय संस्थांनी मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के जागा ताब्यात घेत कार्यालये सुरू केली आहेत.
3. त्यापाठोपाठ तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यालये सुरू केली असून, त्यांचे प्रमाण हे २८ टक्के आहे. इंजिनिअरिंग कंपन्यांनीही १३ टक्के जागा भाड्याने घेत कार्यालये सुरू केली आहेत.

सर्वाधिक दुकाने मॉलमधील
तीन लाख चौरस फुटांपैकी ४६ टक्के जागा कपड्यांच्या दुकानांनी व्यापली आहे. तर, हॉटेल व कॅफे यांच्या जागा भाड्याने घेण्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे. यातील सर्वाधिक दुकाने ही मुंबईतील मॉलमधील आहेत.

भाड्याचे दरही वाढले 
- ज्या कंपन्यांनी कार्यालये भाडेतत्त्वावर घेतली आहेत, त्यांनी किमान तीन हजार चौरस फूट ते कमाल ५० हजार चौरस फुटांपर्यंत कार्यालये स्थापन केलेली आहेत. अंधेरीमधील भाडेतत्वावरील जागांच्या किमतीत गेल्या वर्षभरात वाढ नोंदली गेली असून, तेथील दर आता प्रति महिना प्रति चौरस फूट १२५ रुपयांवर पोहोचले आहेत. 
- मुंबईत सध्या मेट्रोची जी कामे सुरू आहेत अथवा जी पूर्ण झालेली आहेत, त्यामध्ये अंधेरी हे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. तेथील जोडणी वाढल्यामुळेच तेथे कार्यालये स्थापन करण्यास कंपन्या प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

जागा भाड्याने घेण्याचे प्रमाण १२ टक्के
- जानेवारी ते ऑगस्ट २०२४ अशा आठ महिन्यांत मुंबईत गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कार्यालय अथवा दुकाने भाड्याने घेण्यात सहा पट वाढ नोंदली गेली आहे.
- सरत्या आठ महिन्यांत मुंबईतील मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने, व्यावसायिक कार्यालये, अशी एकूण तीन लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. जी जागा भाड्याने गेली आहे, त्यात सर्वाधिक प्रमाण हे कपड्यांच्या व फॅशन ब्रँडच्या दुकानांचे आहे.

Web Title: Six times increase in demand for office spaces Andheri area is more preferred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई