दुसरा डाेस घेण्यासाठी गैरहजर : केईएम रुग्णालय प्रशासनाची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. या दोन्ही रुग्णालयांत चाचणीसाठी एकूण १०१ स्वयंसेवक सहभागी होतील. मात्र, केईएम रुग्णालयातील या मानवी लस चाचणीत सहभागी झालेल्या सहा स्वयंसेवकांनी यातून माघार घेतली आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रुग्णालयात उपस्थित राहिले नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
सहा स्वयंसेवक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आले नाही. कदाचित लसीकरणाविषयी भीती किंवा चिंता हे कारण असू शकते. मात्र, स्वसंमतीनेच ते लसीकरणात सहभागी झाले होते, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली. स्वयंसेवकांना लसीकरणात सहभागी होत असताना, मानवी चाचणीतून बाहेर पडण्याचा हक्क असतो, त्यामुळे याविषयी प्रशासन कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
* आतापर्यंत कोणवरही दुष्परिणाम नाही
नायर रुग्णालयात आतापर्यंत १४८ स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात आला. आतापर्यंत कोणत्याही स्वयंसेवकाला दुष्परिणाम जाणवलेला नाही. शारीरिक व मानसिक पातळ्यांवर स्वयंसेवकांच्या स्वास्थ्याचे परीक्षण केले जात आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले, स्वयंसेवकांकडून मानवी चाचणीचा प्रयोग अर्ध्यावर सोडणे हे दुर्दैवी आहे. यामुळे आता २५ अधिकचे स्वयंसेवक यात सहभागी करून घेतले जातील.