सहा वर्षांनंतर फौजदार दत्तू सरनोबत शहिदांच्या यादीत, पत्नीच्या पाठपुराव्याला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:35 AM2019-07-16T01:35:52+5:302019-07-16T01:35:58+5:30
खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू आप्पा सरनोबत यांचे नाव अखेर सहा वर्षांनी शहिदांच्या यादीत समाविष्ट झाले
मुंबई : वाहन चोरणाऱ्यांना अडविण्याच्या प्रयत्नात जीव गमवावा लागलेले खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू आप्पा सरनोबत यांचे नाव अखेर सहा वर्षांनी शहिदांच्या यादीत समाविष्ट झाले. यासाठी त्यांच्या पत्नीने पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालकांसह मुख्यमंत्र्यांकडे ६ वर्षे पाठपुरावा केला होता. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांना ६ वर्षे वाट पाहावी लागली.
अंधेरीतील रहिवासी असलेले दत्तू सरनोबत हे ३१ आॅगस्टच्या पहाटे ३.२५च्या सुमारास पोलीस शिपायांंसोबत वांद्रे रेल्वे ब्रीज परिसरात गस्त घालत होते. त्याच दरम्यान, रस्त्याच्या पार्क असलेल्या कारमधील चालक कौशल तिवारी हे लघुशंकेसाठी बाहेर उतरणार, तोच त्या ठिकाणी कारमधून आलेल्या लुटारूंनी त्यांना तलवारीच्या धाकात गाडीतून बाहेर काढले आणि गाडी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हालचाली पाहून सरनोबत यांना संशय आला. त्यांनी लुटारूंची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घातल्याने त्यांना धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पुढे, पोलिसांनी गाडीला जीपीएस सीस्टिम असल्याने लुटारूंना त्याच दिवशी पकडले. मात्र, उपचारादरम्यान १५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
असे असतानाही सरनोबत यांचे नाव शहिदांच्या यादीत समाविष्ट झाले नाही. त्यांच्या पत्नी कविता (४८) यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, माझ्या पतीचे नाव शहिदांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी अधिकाºयांना अनेकदा विनवण्या केल्या. मात्र, त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्यांचे नाव शहिदांमध्ये समाविष्ट केले जात नाही, असे सांगण्यात आले. पुढे, वाहतूक पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर, आम्ही पुन्हा पाठपुरावा सुरू केला, तेव्हा याबाबतचा नवीन शासन निर्णय जाहीर झाला. गेल्या वर्षी त्यांची फाइल पोलीस महासंचालक कार्यालयापर्यंत पोहोचली. मात्र, नुकतेच त्यांचे नाव शहिदांच्या यादीत समाविष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘शौर्य’ पुरस्कारही त्यांना नाकारण्यात आला आहे. सध्या त्यांना लागू केलेल्या तीन बिलांपैकी एक बिल देण्यात आले. मात्र, अन्य दोन बिले मंजूर होण्यासाठी अजूनही पोलीस उपायुक्तांच्या पायºया झिजविणे सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. कविता या दोन मुलांसोबत अंधेरी परिसरात राहतात. त्यांचा एक मुलगा पोलीस दलात आहे, तर एक खासगी कंपनीत नोकरी करतो.