सहा वर्षे पाठपुरावा केला, पण कबुतरांपासून सुटकाच नाही; परळकरांचे आरोग्यही धोक्यात; पालिकेवर आगपाखड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:38 IST2024-12-29T14:38:12+5:302024-12-29T14:38:38+5:30
कबुतरांच्या उच्छादामुळे फक्त पादचाऱ्यांनाच नाही, तर परिसरातील रहिवाशांनाही त्रास होत आहे. दुपारच्या वेळेत ही कबुतरे घरात येऊन घाण करत असल्याने नागरिकांना खिडक्या, दरवाजे बंद करू बसावे लागत आहे...

सहा वर्षे पाठपुरावा केला, पण कबुतरांपासून सुटकाच नाही; परळकरांचे आरोग्यही धोक्यात; पालिकेवर आगपाखड
मुंबई : परळच्या गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत कबुतरखाना बंद करण्यासाठी स्थानिक निवासी सोसायट्यांतील समित्यांचा गेली ६ वर्षे पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, पालिका प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जोडिया मॅन्शन चाळ कमिटीने दिला आहे. याबाबत कमिटीने जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन दिले आहे.
कबुतरांच्या उच्छादामुळे फक्त पादचाऱ्यांनाच नाही, तर परिसरातील रहिवाशांनाही त्रास होत आहे. दुपारच्या वेळेत ही कबुतरे घरात येऊन घाण करत असल्याने नागरिकांना खिडक्या, दरवाजे बंद करू बसावे लागत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत कबुतरखान्यासमोर असणाऱ्या कपड्याच्या दुकानात चण्याचे गुदाम आहे. कबुतरांसाठी चणे विकणाऱ्या व्यक्तीने येथील पालिकेचा प्रतिबंधक फलकही फाडून फेकला असून, त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही कमिटीने केली आहे. कबुतरांमुळे अस्वच्छता वाढत असून, नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे,
कबुतरांमुळे सर्व रहिवाशांना दुपारी १२ ते १२:३० वाजेपर्यंत दरवाजे आणि खिडक्या बंद करून राहावे लागेल. कबुतरांची पिसे वाऱ्याने उडून जेवणात येतात. कबुतरांच्या विष्ठेची दुर्गंधी सहन होत नाही. माझ्या आईला या गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. तिला श्वसनाच्या आजाराने ग्रासले आणि त्यातच तिची प्राणज्योत मालवली. आता माझ्या कुटुंबातील व्यक्तींसह चाळीतील इतर रहिवासीही वारंवार आजारी पडत आहेत. या प्रदूषित वातावरणात कसे जगायचे? महानगरपालिका अधिकारी दाद देत नाहीत. हा कबुतरखाना तत्काळ बंद करावा, ही कळकळीची विनंती आता कोण ऐकून घेणार?
- सुनील राणे, अध्यक्ष, जोडिया मेन्शन चाळ कमिटी नं. १०
बोरीवलीतही कबुतरखाना -
- बोरीवली पूर्व येथील कस्तुरबा मार्ग येथेही अशीच परिस्थिती आहे. येथे क्लीन अप मार्शलच्या समोरच कबुतरांना खाद्य टाकले जात आहे. असे असूनही पालिकेकडून कारवाई होत नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
- त्यामुळे येथील बेकायदा कबुतरखान्याची समस्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.