लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून तब्बल पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या महादेव ॲप कंपनीने आपले व्यवहार करण्यासाठी देशभरात तब्बल १६०० बँक खाती उघडली असल्याची माहिती पुढे आली आहे. कंपनीचा संचालक मृगांक मिश्रा याला अलीकडेच मुंबई विमानतळावर अटक झाली. ही बँक खाती उघडण्यामागे त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, महादेव ॲपसाठी देशातून मिळणारा पैसा गोळा करण्यासाठी ही बँक खाती उघडण्यात आली होती. मात्र, ती बनावट पद्धतीने उघडण्यात आल्याचा संशय आहे. अनेक गरीब लोकांच्या सरकारी कागदपत्रांचा वापर करत त्यांच्या नावे ही खाती सुरू करण्यात आल्याचे समजते. ही खाती गरीब लोकांच्या नावावर असली तरी त्याचे व्यवहार मात्र या ॲपचे सूत्रधारच हाताळत होते. या खात्याच्या माध्यमातून जमा झालेले पैसे रोखीने काढून त्याचा हवाला व्यवहार झाल्याचाही तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
मृगांक मिश्रा हे सर्व व्यवहार हाताळत होता. महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांना भारतातून हे पैसे पाठविण्यातही मिश्रा याची भूमिका महत्त्वाची होती. काही महिन्यांपूर्वीच त्याने दुबई येथे पळ काढला होता.