Join us

सोळाशे विद्यार्थी तणावात : मुंबई विद्यापीठाचा निर्णय अजूनही नाहीच; उत्तरपत्रिका सापडल्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:39 AM

मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले असले, तरी अजूनही सोळाशे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले असले, तरी अजूनही सोळाशे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळत नसल्याने, या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले नव्हते, पण आता या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे, पण नक्की सरासरी गुण कशा पद्धतीने देणार आहेत, हे विद्यापीठाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अजूनही हे विद्यार्थी तणावात आहेत.आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी करत असताना, उत्तरपत्रिकांच्या ‘कोडिंग’चा गोंधळ झाल्याने, काही उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली होती. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते, पण आता जवळपास सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.सरमिसळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा शोध सुरू असल्याचे विद्यापीठाने सांगितले होते, पणआता या उत्तरपत्रिकांचा शोधलागत नसल्याने, विद्यापीठाने सरासरी गुणांचा निर्णय घेतला आहे.अभ्यास मंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयात नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, पण विद्यापीठाने अद्याप नियमावली तयार केलेली नाही. त्यामुळे कसे आणि किती गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ