Join us

सहावीतील मुलीने वाचविले सतरा जणांचे प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:19 AM

परळमध्ये आग; झेन सदावर्ते हिने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक

- सागर नेवरेकरमुंबई : परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजव्यावर बुधवारी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले. मात्र १६ व्या मजल्यावर राहणारी सहावीतील विद्यार्थिनी झेन गुणरत्न सदावर्ते हिने प्रसंगावधान राखत शाळेत दिलेल्या अग्निसुरक्षा प्रशिक्षणाच्या सहाय्याने आगीत फसलेले आपले कुटुंबीय आणि शेजारी अशा १७ रहिवाशांचे आश्चर्यकारकपणे प्राण वाचविले. अन्यथा बळींचा आकडा आणखी वाढला असता.इमारतीला सकाळी आग लागल्याचे कळताच प्रत्येक जण मिळेल त्या दिशेने धावत होता. मात्र झेन हिने शांतपणे आग लागल्यानंतर सुरक्षित स्थळ कसे गाठावे, जीव कसा वाचवावा, याबाबत तिसरीत असताना शाळेत घेतलेले प्रशिक्षण अंमलात आणले. एकप्रकारे आणीबाणीच्या याप्रसंगी झेनने सर्व परिस्थितीचा स्वत: ताबा घेत अत्यंत संयमाने व शास्त्रीय दृष्टीकोनातून परिस्थिती हाताळली.सकाळी पावणेआठच्या सुमारास घरात सर्वत्र धूर झाला होता. आम्हाला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे सुरवातीला आम्ही किचनमध्ये गेलो. किचन सर्वात सुरक्षित असल्याचे माझ्या वडिलांना वाटले, असे झेन हिने ‘लोकमत’ला सांगितले.शेजारीही बाहेर जमा झाले. आॅक्सिजनअभावी सर्वांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा ओला रूमाल नाकावर धरून श्वास घ्या. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणार नाही, असे तिने कुटुंबीय व शेजारच्यांना सांगितले. एका मुलीला अस्थमामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता. तिलाही ओला रूमाल देण्यात आला. ओल्या कपड्यामध्ये धुरातील कार्बन शोषला जातो आणि योग्य तो आॅक्सिजन मिळतो, हे तंत्र तिने वापरले. तिने सर्वांना सोळाव्या मजल्यावरील १६०३ या फ्लॅटच्या गॅलरीत नेले. त्याचवेळी आगीच्या वेळी लिफ्ट वापरणे सर्वात धोकादायक असल्याचेही बजावले. आगीतून बाहेर पडत असताना केसही ओले करण्याचा सल्ला तिने दिला.झेनच्या प्रयत्नांमुळे रहिवाशांना धीरआग कधी कमी, तर कधी जास्त होत होती. त्यावेळी आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. तेव्हा सगळ््यांना गुडघ्यावर बसण्यासाठी तिने सांगितले. झेनचे प्रयत्न पाहून रहिवाशांनाही धीर आला आणि आमचे प्राण वाचले, असेही अ‍ॅड. सदावर्ते यांनी सांगितले.बाराव्या मजल्यावर लागलेली आग १३, १४, १५ आणि १६ मजल्यापर्यंत पसरत गेली. आगीचे लोट आणि धुरातून मार्ग काढत जिन्यांवर अडकलेल्या रहिवाशांना खाली उतरविण्याचे काम अग्निशमन दलाने युद्धपातळीवर केले.चार मृतांपैकी दोघांचे मृतदेह लिफ्टमध्ये तर अन्य दोघांचे लॉबीमध्ये आढळले. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले, माझ्या पत्नीने बाथरुममधून आगीचा धूर पाहिला. तिने झेनला उठविले. आम्ही किचनमधील गॅस आणि विजेची उपकरणे बंद केली. झेनने आम्हाला घाबरू नका, असे सांगितले. झेन हिने जळणारे कपडे एका रुममध्ये ठेवण्यास सांगत लोकांना धीर देण्यास सुरुवात केली. आपण सुरक्षित बाहेर पडू, असा धीर तिने सर्वांना दिला. गॅलरीमधून कपडा फडकावावा, त्यामुळे लोक आपल्याला पाहतील आणि वाचवतील. विशेष म्हणजे सुती कपडा पाण्यात गुंडाळा त्याने आगीपासून ५० टक्के सुरक्षित राहता येईल, असेही झेन हिने सूचविल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

टॅग्स :परेल आगमुंबई