Join us

सहावे मालवणी बोली साहित्य संमेलन २३ जून रोजी मुंबईत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 2:41 PM

सहावे मालवणी बोली साहित्य संमेलन रविवार 23 जून रोजी मुंबईत आयोजित होणार आहे.

मुंबई - सहावे मालवणी बोली साहित्य संमेलन रविवार 23 जून रोजी मुंबईत आयोजित होणार आहे. मालवणी  बोली आणि  साहित्य  संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग आणि  मुंबईतील 'सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांच्या  संयुक्त विद्यमाने दादर पूर्व येथील नायर समाज हॉल (स्वामी नारायण मंदिराजवळ) याठिकाणी हे संमेलन आयोजित होणार असून, प्रख्यात मालवणी साहित्यिक, कादंबरीकार प्रभाकर भोगले हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. दक्षिण कोकणात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलिभाषेच्या प्रचार प्रसारासाठी गेल्या काही काळापासून मालवणी भाषिकांकडून जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे संमेलन नियमितपणे आयोजित केले जाते. सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाबाबतची घोषणा डॉ. बाळकृष्ण लळीत आणि प्रकाश सरवणकर यांनी  नुकतीच केली.  ज्येष्ठ मालवणी साहित्यिक  व कादंबरीकार प्रभाकर  भोगले यांची  या संमेलनाचे अध्यक्ष  म्हणून  निवड करण्यात  आली आहे. तर मुंबई  विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर हे या संमेलनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मालवणी भाषिक कलाकार, साहित्यिक विविध क्षेत्रात कार्यरत असलेली प्रख्यात मालवणी व्यक्ति या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मालवणी बोली साहित्य संमेलनात 'गजाली-तुमच्यो नि आमच्यो'हा  उत्फूर्त कार्यक्रम आयोजित होणार आहे. या कार्यक्रमामध्ये '२०२०नंतरचा मालवणी  मुलुख', मालवणीतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या  मुलाखती , 'मालवणी काव्यसंमेलन' असे भरगच्च कार्यक्रम यांचा आस्वार रसिकांना घेता येईल. संमेलनात मराठी -मालवणीतून बोलण्याचे पूर्ण  स्वातंत्र्य  असून 'गजाली'नि 'कविता'फक्त 'मालवणी'बोलीतून सादर करव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  ' जेष्ठ साहित्यिक  कै. प्र. श्री .  नेरूरकरनगरी' असे संमेलनस्थळाला नांव  देण्यात  येणार असून, 'मर्तिक'या धक्कादायक मालवणी  कवितासंग्रहामुळे चर्चेत आलेले अनियतकालिकातील कवी, कादंबरीकार चंद्रकांत  खोत यांचे  नाव व्यासपीठाला देण्यात  येणार आहे.  'विना -मानधन' होणारे  हे संमेलन मालवणीतून लिहिणा-या नवोदित लेखक-कवींना दिशादर्शक विचार देणारे असेल. असा विश्वास  संयोजकांतर्फे  व्यक्त  करण्यात  आला आहे .संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या  बैठकीला डॉ. बाळकृष्ण लळीत, डॉ. सूर्यकांत राऊळ,  प्रभाकर  भोगले तसेच सिंधुदुर्ग  प्रतिष्ठान तर्फे प्रकाश सरवणकर,राजेश राणे, हेमंत पवार, अभिषेक कांबळी, दर्शन  नेवरेकर, नितीन राणे इ. उपस्थित  होते. गिरणगावातील दिवंगत मालवणी  चाकरमान्यांना हे संमेलन समर्पित करण्यात  येणार आहे. संमेलनासंदर्भातील अधिक माहितीसाठी ९६६५९९६२६०/ ९८६९२८०६६०  क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

टॅग्स :मराठीसाहित्यसिंधुदुर्ग