Join us

पदवी इतकेच महत्त्व कौशल्य विकासाला, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आयटीआय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:50 AM

फडणवीस : नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आयटीआय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या पदवी इतकेच महत्त्व कौशल्याला प्राप्त झाले आहे आणि पदवीसोबत कौशल्य असेल तर त्याला अधिक मागणी आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) इमारतीचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी आदी उपस्थित होते. आयटीआयमधील कौशल्य विकासाच्या उपलब्धतेमुळे अर्थव्यवस्थेच्या बदलत्या परिस्थितीत संधीची समानता यामुळे तयार होणार आहे. देशामध्ये असलेले सर्वोत्तम व्यवसाय अभ्यासक्रम या आयटीआयमध्ये सुरू करण्यात येतील, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या आयटीआयमधून समाजातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, अशी अशा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्वच आयटीआयचे बळकटीकरण करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. बदलते तंत्रज्ञान आणि त्यांच्या मागणीप्रमाणे आयटीआयमधील अभ्यासक्रम आणि यंत्रसामग्रीत बदल करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

कौशल्य विकास केंद्राचाही प्रारंभया आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्रही सुरू करण्यात आले असून, या केंद्रामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व इलेक्ट्रिकल वायरमन या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. साधारण ३ ते ६ महिन्यांचे अल्पमुदतीचे विविध अभ्यासक्रम या केंद्रावर विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई