Join us

पोलीस कुटुंबीयांसाठी ‘कौशल्य विकास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2015 3:02 AM

राज्यातील सव्वादोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. बंदोबस्त आणि तपासकामामुळे कुुटुंबाकडे दुुर्लक्ष होत असल्याने आता कुटुंबीयांच्या कौशल्यगुणांना चालना देण्याची जबाबदारी पोलीस दलाने स्वीकारली आहे

जमीर काझी, मुंबईराज्यातील सव्वादोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. बंदोबस्त आणि तपासकामामुळे कुुटुंबाकडे दुुर्लक्ष होत असल्याने आता कुटुंबीयांच्या कौशल्यगुणांना चालना देण्याची जबाबदारी पोलीस दलाने स्वीकारली आहे. महिला कुटुंब सदस्यांच्या अंगभूत कौशल्याला संधी मिळण्यासाठी प्रत्येक आयुक्तालय, अधीक्षक कार्यक्षेत्रातील मुख्यालयात मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. दिवाळीनिमित्त पोलिसांच्या कुटुंबातील महिलांनी बनविलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू, हस्तकला, फराळाचे पदार्थ आदी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध स्टॉल लावले जावेत, यासाठी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आग्रही आहेत. याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. समाजात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सणासुदीच्या दिवसांत कार्यरत असलेल्या खाकी वर्दीवाल्यांच्या कुुटुंबीयांसाठी हे दिवाळीचे अनोखे ‘गिफ्ट’ ठरले आहे.दिवाळीच्या दिवसांत सर्वसामान्य नोकरदार सुटी घेऊन सण साजरा करतात. पोलीस मात्र त्यांची दैनंदिन कर्तव्ये बजावत असतात. तपासकामांबरोबरच ते बंदोबस्तातही व्यस्त असतात. रोज सरासरी १२ ते १४ तास आॅन ड्युटी राहावे लागत असल्याने कुटुंबाकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष होते. त्यामुळे कुटुंबातील महिला सदस्यांना अंगभूत कौशल्य दाखविण्यास वाव नसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळातही घरात अनेकदा निराश वातावरण असते. पोलीस महासंचालक दीक्षित यांनी यावर तोडगा काढण्याचे ठरवले आहे. प्रत्येक आयुक्त, अधीक्षकांवर यासाठी अभिनव प्रयोग राबवण्याची जबाबदारी सोपविली आहे. मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सभागृहांमध्ये महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविले जावे, यासाठी दीक्षित आग्रही आहेत. या प्रदर्शनामुळे कौशल्य विकास तर साधला जाईल, शिवाय काही प्रमाणात आर्थिक फायदाही होईल. मेळाव्याचे आयोजन करून त्याचा अहवाल पोलीस मुख्यालयात त्वरित पाठविण्याचे आदेश दीक्षित दिले आहेत.