Join us

महापालिका शाळांमध्ये मिळणार कौशल्य शिक्षण; सरकारचा सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 8:46 AM

मुंबई महापालिकेच्या निवडक शाळांमधील वय वर्षे १५ वरील मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांतील १ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.  

मुंबई महापालिकेच्या निवडक शाळांमधील वय वर्षे १५ वरील मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर एकूण १ हजार १४६ शाळांपैकी टप्प्याटप्प्याने २४९ शाळांमधील नववी ते दहावीतील ४१ हजार ७७४ इतक्या विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने सहावी ते आठवीतील ९६ हजार ९२२ विद्यार्थ्यांनाही या प्रशिक्षणाचा फायदा देता येईल असा मानस असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.  

 सामंजस्य करारावर कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव आणि कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी स्वाक्षऱ्या करून त्याचे आदान-प्रदान केले.