कौशल्य विद्यापीठाची निवड प्रक्रिया उद्यापासून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:31 PM2023-07-31T12:31:40+5:302023-07-31T12:32:15+5:30
नवीन शैक्षणिक धोरणानुसार यात विविध प्रकारच्या १८ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.
मुंबई : पहिल्या राज्य कौशल्य विद्यापीठातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिल्या टप्प्याची निवड प्रक्रिया मंगळवारपासून (१ ऑगस्ट) सुरू होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यात विविध प्रकारच्या १८ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.
या पहिल्या कौशल्य विद्यापीठातील १८ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती अल्पावधीत केली असून, त्या सर्व अभ्यासक्रमांची सांगड उद्योगजगताशी सांगड आहे. विद्यापीठाने २ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रायोगिक तत्त्वावर काही अभ्यासक्रम सुरूही केले होते.
चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना असिस्टंट स्टोअर मॅनेजरसारख्या पदावर रूजू होण्याची संधीही मिळणार आहे. ‘बीबीए रिटेल’ अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. पहिली दोन वर्षे पूर्ण करून एखाद्या विद्यार्थ्याला तो मध्येच सोडायचा झाल्यास त्याला दोन वर्षांनंतर पदविका, तीन वर्षांनंतर बीबीए ओएलसी व चार वर्षांनंतर पदवी घेता येईल. पदवीच्या पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित उद्योग समुहात प्रशिक्षणाची संधी मिळेल.
नावीन्यपूर्ण संकल्पना
मेजर क्रेडिट, मायनर क्रेडिट, स्किल बेस कोर्स आणि ऑन जॉब ट्रेनिंग याचा समावेश केला आहे. तसेच ४० टक्के अभ्यासक्रम वर्गात व ६० टक्के अभ्यासक्रम ऑन द जॉब ट्रेनिंगच्या स्वरूपात शिकविण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणण्यात येणार आहे.