Join us

हॉटेलच्या एटीएम मशीनमध्येच बसविले स्किमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हॉटेलच्या एटीएम मशीनमध्ये स्किमर बसवून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हॉटेलच्या एटीएम मशीनमध्ये स्किमर बसवून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. बँक खातेदारानी कुठलीही माहिती शेअर केली नसतानाही नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे जात होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.

पथकाने संबंधित खातेधारकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यातील कार्डधारकांनी अंधेरी येथील महाकाली केव्हज रोडवरील हॉटेलमध्ये कार्डद्वारे व्यवहार केल्याची माहिती समोर आली. हाच धागा पकडून गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने हॉटेलमध्ये धाव घेतली. तेव्हा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याची माहिती समोर आली. कामावरुन काढल्यानंतरही ते हॉटेल बाहेर येत असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून मॅनेजर यशवंत राजेश गुप्ता उर्फ सोनू (२३), अजहरुद्दीन अन्सारी (२२), इस्तियाक जमाल अहमद खान (२२) यांना बुधवारी अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीतून यामागील मुख्य सूत्रधार मोहम्मद फैज कमर हुसेन चौधरी (२७) यालाही गुरूवारी अटक करण्यात आली. तो जोगेश्वरीचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून एक स्किमर, ९ मॅग्नेटिक स्ट्रिप, ७ डेबिट कार्ड, ३ मोबाईल फोन आणि २७ हजार रूपयांची रोकड मिळून आली. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अनेक ग्राहकांच्या खात्यातील लाखो रूपयांवर हात साफ केल्याची माहिती समोर आली. अटक आरोपींना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

....

पुणे, साताराच्या एटीएममधून काढले पैसे

पुणे, सातारा येथील एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीमध्ये ते पैसे काढताना दिसून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध ओशिवरा, खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

....

तुमच्याही खात्यातून पैसे गेले का?

तुम्हीही या टोळीच्या जाळ्यात अडकला असाल तर तक्रार करण्यासाठी पुढे या असे आवाहनही गुन्हे शाखेने केले आहे.