कीर्ती ढाल ते आॅस्कर व्हाया ‘विज्ञान प्रदर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:42 AM2018-03-04T01:42:07+5:302018-03-04T01:42:07+5:30

लहान असताना विजेची उपकरणे कुतूहलापोटी उघडणारा, पाहून झाल्यावर परत बंद करून उपकरण सुरू करण्याचा प्रयत्न करणारा मुलगा विज्ञान दिनानिमित्त आयोजित होणाºया शाळेच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये हिरिरीने सहभाग घेऊ लागला.

 'Skin Exhibition' by Kirti Shield and Oscar | कीर्ती ढाल ते आॅस्कर व्हाया ‘विज्ञान प्रदर्शन’

कीर्ती ढाल ते आॅस्कर व्हाया ‘विज्ञान प्रदर्शन’

Next

- अक्षय चोरगे

लहान असताना विजेची उपकरणे कुतूहलापोटी उघडणारा, पाहून झाल्यावर परत बंद करून उपकरण सुरू करण्याचा प्रयत्न करणारा मुलगा विज्ञान दिनानिमित्त आयोजित होणाºया शाळेच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये हिरिरीने सहभाग घेऊ लागला. त्या मुलाने पुढे जाऊन तंत्रशिक्षण घेतले. मित्रांच्या साहाय्याने वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरा त्याने तयार केला. याच मुलाने यंदाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागातील आॅस्करवर स्वत:चे नाव कोरले. ‘विकास साठ्ये’ हे मराठी नाव आॅस्करने सन्मानित झाले. साठ्ये आणि त्यांच्या सहकाºयांनी मिळून तांत्रिकदृष्ट्या ताकदीचा ‘शॉटओव्हर के १’ हा कॅमेरा तयार केला आहे.
या कॅमेरासाठी त्यांना
व त्यांच्या सहकाºयांना यंदा आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या आॅस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या साठ्ये यांनी बुधवारी साजºया झालेल्या ‘विज्ञान दिना’निमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या या खास मुलाखतीत त्यांच्या शाळेतील विज्ञान प्रदर्शन ते आॅस्करपर्यंतच्या प्रवासाचे
अनेक पैलू उलगडले.

यशाचे श्रेय कोणाला जाते?
प्रामुख्याने माझी शाळा आणि शाळेतील विज्ञान प्रदर्शनांना याचे श्रेय जाते. मी मुलुंड येथील नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाळेत विज्ञान प्रदर्शनांमध्ये मी सहभाग घ्यायचो. पाचवीमध्ये असताना मी ‘स्कायलॅब’ (अंतराळातील प्रयोगशाळा) तयार केली होती. त्यामुळे माझे खूप कौतुक झाले. कौतुकामुळे काहीतरी अधिक चांगले करण्याची इच्छा निर्माण झाली. सहावीत असताना मी ‘रनिंग लाइट’ तयार केली होती. सातवीमध्ये असताना मी इमारतीमधील मोटारवर चालणाºया लिफ्टची प्रतिकृती तयार केली होती. १०वी इयत्तेत मी इलेक्ट्रिक मोटार तयार केली. त्या वर्षी मला शाळेने कीर्ती ढाल देऊन गौरवले. या विज्ञान प्रदर्शनामुळे मी हळूहळू विज्ञान, तंत्रज्ञान, प्रयोग, संशोधन या गोष्टींकडे वळलो.

पालकांनी कसे साहाय्य केले?
विज्ञान माझा सर्वांत आवडता विषय. लहानपणी बॅटरी व दिवे तयार करणे, विद्युत उपकरणांसोबत खेळणे हा माझा आवडता छंद होता. माझ्या आई-वडिलांनी माझा हा छंद जोपासला. वेळोवेळी काटकसर करून मला पैसे दिले. माझा मोठा भाऊ मला मदत करायचा. आम्ही खेळणी, इलेक्ट्रिकल वस्तू उघडायचो. अनेकदा त्या वस्तू पुन्हा जोडता न आल्याने वस्तू नादुरुस्त व्हायच्या. तरीही आई-बाबांनी पाठीशी घातले.

विज्ञान दिन कसा साजरा करायला हवा?
विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाविषयी प्रेरणा मिळेल, असे उपक्रम राबवून विज्ञान दिन साजरा करायला हवा. विज्ञान प्रदर्शन, स्पर्धांचे आयोजन व्हायला हवे. कल्पक बुद्धीला सुचतील असे प्रयोग सादर करण्याची मुभा असावी. संशोधकांसोबत गप्पा मारण्याची संधी मिळावी.

वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?
विद्यार्थ्यांच्या प्रयोगशील संकल्पनांना वाव मिळायला हवा. त्यांना त्यांच्यामधील वैज्ञानिक शोधता येईल असे उपक्रम होणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. विज्ञान विषयाचा अभ्यास करताना थियरीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर देणे गरजेचे आहे. त्यामुळे संकल्पना स्पष्ट होतील.

तुम्हाला आॅस्कर मिळवून देणाºया ‘शॉटओव्हर के १’ कॅमेराची वैशिष्ट्ये काय?
‘शॉटओव्हर के १’ कॅमेºयाद्वारे हेलिकॉप्टर किंवा विमानातून थेट शूटिंग करता येईल. हेलिकॉप्टर किंवा विमानात खूप मोठ्या प्रमाणात कंपने (व्हायब्रेशन) होतात, अनेकदा हादरे बसतात. तशा परिस्थितीतही हा कॅमेरा स्थिर राहतो, कंपने होत नाहीत. तसेच तो हाताळण्यास सोपा आहे. अगोदर आम्ही २ डी आणि नंतर याच कॅमेºयामध्ये ३ डी तंत्रज्ञान विकसित केले. या कॅमेºयाला ६ वेगवेगळे अ‍ॅक्सिस आहेत. आमच्या कॅमेºयाव्यतिरिक्त सर्व कॅमेºयांत पाच अ‍ॅक्सिस उपलब्ध होते.

कॅमेरा विकसित करण्याच्या प्रवासाबाबत काय सांगाल?
जॉन कॉईल यांच्या कंपनीमध्ये न्यू झीलंड येथे आम्ही कॅमेरावर संशोधन केले. मी हा कॅमेरा तयार करताना सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी काम केले. जॉन स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. तसेच आमच्या सोबत बॅ्रड हार्डेल (मेकॅनिकल इंजिनीअर) आणि शेन बुकहॅम (इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड हार्डवेअर इंजिनीअर) यांनी आमच्या सोबत काम केले. जॉन यांची अशी संकल्पना होती की, कोणतेही अडथळे न येता उत्कृष्ट पद्धतीचे चित्रीकरण या कॅमेºयाने शक्य व्हावे. चालक आणि कॅमेरात संपर्क गरजेचा नाही. केवळ एकच व्यक्ती सहज कॅमेरा हाताळू शकेल. त्यानुसार आम्ही २००९ ते २०११ अशी तीन वर्षे मेहनत करून २ डी कॅमेरा तयार केला; आणि त्यानंतर २०११ ते २०१२ दीड वर्षात ३ डी कॅमेरा विकसित केला. आतापर्यंत १५० हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांसाठी या कॅमेराचा वापर करण्यात आला आहे.

हॉलिवूडने कॅमेराकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले?
हॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक सिनेमाची भव्यता, चित्रीकरणाबाबत काहीच तडजोड करीत नाहीत. त्यामुळे आमचा कॅमेरा म्हणजे त्यांच्यासाठी गरजेची वस्तू झाल्याने कॅमेरा भाड्याने देणे, नव्या कॅमेराची मागणी होणे वाढले. न्यू झीलंड, आॅस्ट्रेलियन आणि बॉलिवूडमधील दिग्दर्शकांनीही कॅमेराची वेळोवेळी मागणी केली.

तरुणांना काय संदेश द्याल?
भारतीय तरुणांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता नाही. आता आपल्या देशातही उच्च दर्जाचे शिक्षण मिळते. अभ्यास करताना (विशेषत: विज्ञानाचा) थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भर द्या. परीक्षार्थी होण्यापेक्षा ज्ञानार्थी व्हा. शिवाय पालकांनीदेखील मुलांना मातृभाषेत प्राधान्याने शिक्षण द्यावे. मी फिरलेल्या अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण देण्याकडे पालकांचा जास्त कल असल्याचे पाहिले आहे.

Web Title:  'Skin Exhibition' by Kirti Shield and Oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई