तळपत्या उन्हामुळे त्वचेचा दाह
By admin | Published: April 18, 2016 12:58 AM2016-04-18T00:58:19+5:302016-04-18T00:58:19+5:30
एप्रिल महिन्यात राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचे चटके मुंबईकरांनाही बसत आहेत. सतत वाढत्या तापमानामुळे मुंबईकर कमालीचे हैराण झाले आहेत. सध्या मुंबईकरांच्या त्वचेचा दाह
मुंबई : एप्रिल महिन्यात राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचे चटके मुंबईकरांनाही बसत आहेत. सतत वाढत्या तापमानामुळे मुंबईकर कमालीचे हैराण झाले आहेत. सध्या मुंबईकरांच्या त्वचेचा दाह वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात स्वच्छ सुती कपडे वापरा, स्वच्छता ठेवा असा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांकडून मुंबईकरांना दिला जात आहे.
एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चढा असल्यामुळे मुंबईकरांच्या त्वचेला जळजळ होणे, पुरळ उठणे, त्वचा लाल होणे, घामोळे येणे अशा प्रकारचे त्रास मुंबईकरांना होत आहेत. उन्हाळ््यात जास्त प्रमाणात नायटा हा त्वचेचा आजार जडतो. बुरशीच्या संसर्गामुळे नायटा हा आजार होतो. मुंबईत घाम जास्त येत असल्यामुळे शरीरावर दुमडल्या जाणाऱ्या ठिकाणी घाम राहून नायटा होतो. शरीरावर चट्टे दिसले आणि खाजही येत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांना दाखवून औषध घेणे आवश्यक आहे. औषधाच्या दुकानातून क्रीम घेऊन लावल्यास नायटा अधिक वाढतो आणि त्याचा अधिक त्रास होतो. घामामुळे मानेवर, पाठीवर घामोळे येते, म्हणजे पुरळ येते. घामोळे कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे, शरीर स्वच्छ ठेवणे हे महत्त्वाचे दोन उपाय असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. योगेश कल्याणपाड यांनी सांगितले.
डॉ. योगेश पुढे म्हणाले, शरीरावर लाल पुळ््या येतात किंवा त्वचा लाल होते. अनेकदा घाम अधिक काळ त्वचेवर राहिल्यानेही त्वचेला त्रास होतो. आणि उन्हात जास्त वेळ फिरल्याने त्वचा काळी पडते. उन्हात फिरल्याने त्वचेचे होणारे नुकसान अधिककाळ टिकू शकते. त्यामुळे उन्हात फिरताना त्वचा झाकणे अत्यंत गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
१सायन रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाच्या डॉ. अक्रेती सोब्ती यांनी सांगितले, उन वाढल्याने त्वचेला जास्त त्रास होतो. कारण त्वचेला इतक्या जास्त तापमानाची आणि किरणांची सवय नसते. याकाळात त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा हात-पाय, शरीरातील अवयव दुमडले जातात त्या भागातील त्वचा लाल होते. याला वैद्यकीय परिभाषेत ‘इंटरट्रायगो’ असे म्हणतात.
२त्वचेचा त्रास वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. घाम आल्यावर जास्त काळ तसाच न ठेवता त्वचा कोरडी ठेवली पाहिजे. उन्हाळ्यात तंग, घट्ट कपडे घालणे टाळावे. सुटसुटीत सुती कपड्यांचा वापर करावा. दिवसातून दोनदा आंघोळ करावी. शरीराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.