खासगी क्लासेसना जीएसटीतून वगळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:14 AM2018-09-12T02:14:05+5:302018-09-12T02:14:18+5:30
खासगी क्लासचालक सरकारकडून अनुदान घेत नाहीत, उलट आपल्या उत्पन्नावर प्राप्तिकर आणि व्यवसाय कर भरतात.
मुंबई : खासगी क्लासचालक सरकारकडून अनुदान घेत नाहीत, उलट आपल्या उत्पन्नावर प्राप्तिकर आणि व्यवसाय कर भरतात. त्यामुळे सरकारने खासगी क्लास चालकांना जीएसटीमधून वगळावे, यासाठी महसूल सचिवांशी चर्चा करण्याचा निर्णय महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन संघटनेकडून घेण्यात आला आहे. १८ टक्के जीएसटी आकारणे, हा क्लास चालकांवर अन्याय असून, त्याचा अधिभार पालकांनाही सहन करावा लागत असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान या संघटनेकडून करण्यात आला. या वेळी क्लास संघटनांच्या समस्यांवर ही चर्चा झाली.
शिक्षणक्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा ओढा खासगी कोचिंग क्लासेसकडे वाढला आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, त्यात सातत्याने होणारे बदल, महाविद्यालयीन स्तरावर योग्य मार्गदर्शन न मिळणे, विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमांतील तफावत, तसेच प्रवेशासाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे कोचिंग क्लासेसचे पेव वाढत चालले आहे. मागील काही वर्षांपासून या क्लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. या क्लासेसची महाविद्यालयांना समांतर यंत्रणा उभी राहू लागली आहे. त्यातच वाढत्या शुल्कामुळे विद्यार्थी व पालक बेजार झालेले आहेत. आता त्यात पुन्हा जीएसटीची भर पडल्याने याचा फटका विद्यार्थी पालकांसह क्लास चालकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यामुळे या विषयावर आपण महसूलमंत्र्यांशी लवकरच संवाद साधू, असे संघटनेचे अध्यक्ष सचिन कर्णावत यांनी सांगितले.
>‘भारताला पहिल्या ५ क्रमांकात पाहण्याची इच्छा’
या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कोहिनूर क्लासेसचे सर्वेसर्वा मनोहर जोशी उपस्थित होते. त्यांनी कोहिनूरमध्ये सध्या शिकत असलेल्या १२ हजार विद्यार्थ्यांचा प्रवास या वेळी उलगडला. तसेच आपला देश हा जगातील विकासाच्या क्षेत्रात पहिल्या ५ मध्ये आला पाहिजे, ही आपल्या आयुष्यातील शेवटची इच्छा आहे. यात काही अशक्य नाही. नकारार्थी विचार ठेवू नका. शिक्षणासाठी आणि काही करण्यासाठी कारणे सांगू नका, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.