टपावरील टपोरींची आरपीएफकडून धरपकड
By Admin | Published: October 22, 2015 02:21 AM2015-10-22T02:21:17+5:302015-10-22T02:21:17+5:30
लोकलच्या टपावरून प्रवास करताना होणारे अपघात आणि त्यामुळे लोकलच्या वक्तशीरपणात येणारा अडथळा, यामुळे टपावरील टपोरींविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय मध्य
मुंबई : लोकलच्या टपावरून प्रवास करताना होणारे अपघात आणि त्यामुळे लोकलच्या वक्तशीरपणात येणारा अडथळा, यामुळे टपावरील टपोरींविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी सात दिवसांची मोहीम हाती घेण्यात आली असून, दोन दिवसांत ५७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
काही टपोरी प्रवाशांकडून लोकलच्या टपावरून प्रवास केला जातो. लोकलच्या टपावरून प्रवास करणे हे धोकादायक असून, ओव्हरहेड वायरला चिकटण्याचा धोका संभवतो. यामध्ये प्रवाशाचा जीव तर जातोच, शिवाय लोकल सेवाही विस्कळीत होते, तसेच टपावरून प्रवास करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे हा प्रवास टाळा, असे आवाहन रेल्वेकडून वारंवार करण्यात येते. तरीही याकडे काही टपोरी प्रवाशांकडून दुर्लक्ष केले जाते.
हार्बर मार्गावर टपावरून प्रवास करणाऱ्या टपोरी प्रवाशांचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने आरपीएफच्या मदतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २0 आॅक्टोबरपासून सात दिवसांची विशेष मोहीम आरपीएफकडून घेण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी या गर्दीच्या वेळेत २0 आॅक्टोबर रोजी लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्या ३७ जणांना अटक करण्यात आली, तर २१ आॅक्टोबर रोजी २0 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली.