लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सलग तीन ते चार दिवस मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शनिवारी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. शनिवारी सकाळी मुंबईकरांना तीन ते चार दिवसांनी सूर्यनारायणाचे दर्शन झाले खरे, मात्र दुपारी पुन्हा एकदा दाटून आलेल्या ढगांनी मुंबईत काळोख केला होता. दुपारनंतर सायंकाळीदेखील मुंबईचे असेच काहीसे वातावरण होते. दरम्यान, आता पुढील २४ तासांत मुंबईत अवकाळी पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली तरी राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक अवकाळी पावसाची हजेरी लागेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई पुन्हा किंचित ढगाळ नोंदविण्यात आली आहे. पुणे येथे ३३.२ तर महाबळेश्वर येथे २७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात पडलेल्या सध्याच्या पावसाने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. २३ जानेवारी १९४८ रोजी पुण्यात २२.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. शनिवारी मुंबईत बऱ्यापैकी ऊन पडले असले तरी राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत होती. हवामान खात्याने शनिवारी दुपारी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली होती. तर शनिवारी सकाळपासून धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यात सर्व भागात ढगाळ वातावरण होते. पावसाची रिपरिप होती, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. याव्यतिरिक्त सिंधुदुर्ग, सांवतवाडी येथेदेखील पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातदेखील अशीच स्थिती असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण होते.