जोगेश्वरी स्थानकाजवळील स्कायवॉक रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 07:21 AM2017-10-18T07:21:53+5:302017-10-18T07:22:05+5:30
जोगेश्वरी पूर्वेकडील स्कायवॉकचे काम सात महिन्यांपासून रखडले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील स्कायवॉकचे काम सात महिन्यांपासून रखडले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जोगेश्वरी पूर्व स्थानकाशेजारी स्कायवॉक बांधण्याचे काम कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. परंतू अद्याप स्कायवॉकच्या पायाची उभारणी झालेली नाही. स्कायवॉकच्या कामासाठी लागणारे साहित्य रस्त्यावर ठेवण्यात आले असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सद्यस्थितीमध्ये स्कायवॉकचे पिलर क्रमांक ७, ८, ९, १०, ११ आणि १२ चे काम सुरु होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तसेच स्कायवॉकचे पिलर रस्त्याच्या मधोमध असल्याने रेल्वे प्रवासी आणि खरेदीला आलेल्या ग्राहकांना त्रास होत आहे. रस्त्याच्या एकाबाजूला मार्केट व रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकाने आहेत. रेल्वे प्रवासी सुध्दा याच रस्त्याचा वापर करतात. ज्यावेळी हा प्रकल्प हाती घेतला. तेव्हा कंत्राटदाराने सांगितले की, हा प्रकल्प सहा महिन्यांत पुर्ण होईल. परंतू सात महिने उलटून गेले तरी स्कायवॉचा पाया रचलेला नाही, असे दुकानदारांनी सांगितले.
स्कायवॉकसाठी खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाण्यामुळे डांसाचा प्रादुर्भाव वाढत असून साथीचे आजार पसरत आहेत, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. दिवाळीमध्ये कामाला सुरुवात होईल. स्कायवॉकसाठी लागणारे साहित्य रखडलेले होते. पण लवकरच काम सुरू होईल, असे सुत्राने सांगितले.
स्कायवॉकच्या नावाखाली पैशाची उधळण केली जात आहे. जोगेश्वरी स्थानकापासून ते इस्माईल युसुफ कॉलेजपर्यंत स्कायवॉकचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्कायवॉकचा प्रवाशांना काहीच फायदा नाही. स्कायवॉक थेट हायवेला जोडाला तरच प्रवासी याचा वापर करतील.
पावसापूर्वी स्कायवॉकच्या कामाला सुरुवात झाली. कामाचे व्यवस्थित नियोजन नसल्याने ड्रिलिंग करताना पाण्याची पाईपलाईन फुटली. याने दोन दिवस परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यानंतर लगेच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. स्कायवॉकचा नेहमी पाठपुरावा करत असतो. कंत्राटदाराने कामाचे नियोजन केले नाही. परिणामी स्कायवॉकचे काम रखडले आहे. आता दिवाळीनंतर कामाला सुरुवात होईल. ३१ मार्चपर्यंत काम संपवण्याची मुदत दिली आहे. काम लवकर पूर्ण करुन प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात.
- पंकज यादव, नगरसेवक
स्कायवॉकचे काम सात महिने रखडले आहे. पत्रव्यवहाराकडे कोणीच लक्ष देत नाही. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी. रखडलेले काम पुर्ण करावे.
-मनीष पटेल, सामाजिक कार्यकर्ता