स्कायवॉक, मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट
By admin | Published: May 2, 2017 03:59 AM2017-05-02T03:59:40+5:302017-05-02T03:59:40+5:30
भरधाव येणाऱ्या वाहनांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी बांधलेले पूलच धोकादायक ठरू लागले आहेत
मुंबई : भरधाव येणाऱ्या वाहनांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी बांधलेले पूलच धोकादायक ठरू लागले आहेत. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बांधलेल्या पुलांचीही अशीच अवस्था आहे. या पुलांवरून दररोज लाखो मुंबईकर व त्यांच्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा पुलांचे विशेषत: स्कायवॉकचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
महापालिकेने गेल्या वर्षी केलेल्या एका सर्वेक्षणातून मुंबईतील ५६ पुलांची तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे उजेडात आले. यापैकी २२ शहर, ३० पूर्व उपनगर आणि चार पश्चिम उपनगरात आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने (स्टॅक) केलेल्या शिफारशींनुसार पालिकेने या पुलांची तपासणी सुरू केली. मात्र काही महिन्यांनी पालिकेने पुन्हा डोळ्यांवर झापडे लावून घेतली. (प्रतिनिधी)
फेब्रुवारी महिन्यात दहिसर पश्चिम येथील स्कायवॉकचा भाग अचानक कोसळल्याने तेथून जाणारे सुनील कुलकर्णी हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते. मुंबईतील अनेक पादचारी पूल मोडकळीस आले आहेत. पादचाऱ्यांसाठी बांधलेले स्कायवॉक गर्दुल्ले व भिकाऱ्यांचे अड्डे झाले आहेत. त्यामुळे या पुलांचे स्टक्चरल आॅडिट करून ते सुरक्षित करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे केली आहे.
पुलांचे भवितव्य आयुक्तांच्या हाती
पुलांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने उदासीन धोरण अवलंबिले आहे. तर गेल्या वर्षी घोटाळेबाज ठेकेदारच चार महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीसाठी पुढे आल्याने ते काम लांबणीवर पडले. त्यामुळे पूल व स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी आता ही ठरावाची सूचना मांडण्यात आली आहे.
ही ठरावाची सूचना महासभेत मंजूर झाल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांनी अनुकूलता दाखविल्यास पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटला गती मिळू शकेल.
मुंबईत ३१४ पूल आहेत. यापैकी काही पूल ब्रिटिशकालीन असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी नियुक्त स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने २००९मध्ये दुरुस्तीची शिफारस केली.
महापालिकेचे पूल
नाले-नद्यांवरील पूल ४३, रेल्वेवरील पूल ४१, उड्डाणपूल १६, पादचारी पूल ४९, रेल्वेवरील पादचारी पूल ३६, वाहनांचे भुयारी मार्ग १०, पादचारी भुयारी मार्ग १९.
विभागानुसार विभागणी
शहरातील पूल ८१
पश्चिम उपनगरांतील पूल १४३
पूर्व उपनगरांतील पूल ९०
स्कायवॉक दुर्लक्षित
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने एकूण ३६ स्कायवॉक मुंबईत बांधले. पहिल्या स्कायवॉकचे उद्घाटन २४ जून २००८ रोजी झाले.
२०१०मध्ये केलेल्या २३ स्वायवॉकच्या सर्वेक्षणानुसार दररोज सरासरी पाच लाख ६५ हजार पादचाऱ्यांची यावरून ये-जा सुरू असते.
२०११मध्ये एमएमआरडीएने याचा ताबा महापालिकेकडे दिला. त्यानुसार मुंबई महापालिकेमार्फत या स्कायवॉकची देखभाल केली जात आहे.