स्लॅब तुटून महिला थेट पाचव्या मजल्यावर; बोरीवली संक्रमण शिबिरामधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:14 AM2023-04-11T07:14:47+5:302023-04-11T07:15:55+5:30
बोरिवलीमध्ये सहाव्या मजल्याचा स्लॅब तुटून एक महिला थेट पाचव्या मजल्यावर जाऊन पडली.
मुंबई:
बोरिवलीमध्ये सहाव्या मजल्याचा स्लॅब तुटून एक महिला थेट पाचव्या मजल्यावर जाऊन पडली. या महिलेला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी श्री उमैया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या एकूण चार संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोरिवली पश्चिमच्या रामबाग लेनमध्ये जयलक्ष्मी ट्रान्झिट कॅम्प आहे. या ठिकाणी राजन नलय्या (वय ५३) हे त्यांची पत्नी अनिता (४७) व दोन मुलांसह राहात असून, मालाडच्या एका रेस्टॉरंटमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २०१० रोजी त्यांची सोसायटी एसआरए प्रकल्पाअंतर्गत पुनर्विकसित करण्यासाठी त्यांनी उमय्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक छगन कांजी पोकर, प्रवीण अगरवाल, राजेश कुमार जोतांगीया आणि रवीलाल पटेल यांना दिली होती. त्यानुसार बिल्डरने त्यांना ६ ऑगस्ट, २०११ रोजी ॲग्रिमेंट फॉर शिफ्टिंग टू अल्टरनेट एकोमोडेशन करारानुसार १२३ जणांना संक्रमण शिबिरात हलवले. हा करारनामा १८ महिन्यांसाठी होता, मात्र बिल्डरने त्यांना ताबा दिलाच नाही. तसेच ९३ सभासदांना रूम भाडेदेखील दिले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. बिल्डरने तयार केलेल्या नवीन सोसायटीत अजूनही पाण्याची व्यवस्था केलेली नाही तसेच अनेकांना रूमचा ताबा दिला नाही. त्यामुळे पाण्याअभावी बरेच लोक हे संक्रमण शिबिरातच राहतात. त्यानुसार नलय्या हे देखील संक्रमण शिबिराच्या सहाव्या मजल्यावर राहतात, जी इमारत २००९ मध्ये बांधण्यात आली आहे.
उजव्या खांद्याला, छातीला गंभीर दुखापत
९ एप्रिल रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास अनिता स्वच्छतागृहात जात असताना त्यांच्या पायाखालील स्लॅब खाली कोसळला. त्यासोबत अनिता ही थेट पाचव्या मजल्यावर जाऊन पडल्या.
ते पाहून त्यांच्या मुलाने आणि स्थानिकांनी धाव घेत जवळ अमर नर्सिंग होममध्ये हलवले. जिथे त्यांच्या पाठीला, उजव्या खांद्याला, छातीला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यानुसार नलय्या यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ३३७ अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.