सीवूडमध्ये पुन्हा स्लॅब कोसळला
By Admin | Published: September 11, 2014 12:45 AM2014-09-11T00:45:52+5:302014-09-11T00:45:52+5:30
शहरात जुन्या इमारतीमधील स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी सीवूडमधील नवघरकुल इमारतीतील फ्लॅटमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले
नवी मुंबई : शहरात जुन्या इमारतीमधील स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी सीवूडमधील नवघरकुल इमारतीतील फ्लॅटमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे सिडकोच्या जुन्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सिडकोकडून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
सीवूड सेक्टर ‘४८ ए’मधील नवघरकुल सोसायटीतील नानाभाऊ कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये रात्री पावणेतीनच्या सुमारास छताचा ५० टक्के भाग अचानक कोसळला. यात नानाभाऊंचा गुडघा फ्रॅक्चर झाला तर त्यांची पत्नी नीलम हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दोघांना उपचारासाठी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या अपघातानंतर कांबळे कुटुंबीयांनी व स्थानिक नगरसेविका कविता भरत जाधव यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांना पत्र देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सदर घर राहण्यास योग्य नसून उरलेला स्लॅबचा मलबा कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे. याआधी वाशीमधील गुलमोहोर सोसायटीमध्येही स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती.