Join us

स्लॅब पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 3:44 AM

रो हाऊसच्या छताचा भाग कोसळून मजुराच्या मृत्यूची घटना शुक्रवारी सकाळी वाशी येथे घडली. रो हाऊसच्या पुनर्बांधणीचे काम सुरु असताना छताचा काही भाग तुटल्याने हा अपघात

नवी मुंबई : रो हाऊसच्या छताचा भाग कोसळून मजुराच्या मृत्यूची घटना शुक्रवारी सकाळी वाशी येथे घडली. रो हाऊसच्या पुनर्बांधणीचे काम सुरु असताना छताचा काही भाग तुटल्याने हा अपघात घडला. रो हाऊसच्या छतावर अनधिकृतपणे वाढीव बांधकाम सुरु असताना हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रो हाऊस मालकासह ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी सकाळी वाशी सेक्टर ७ येथे हा अपघात घडला. त्याठिकाणच्या पी लाइनमधील २३ क्रमांकाच्या रो हाऊसच्या पुनर्बांधणीचे काम सुरु होते. गिरीशचंद्र भटनागर यांचे हे रो हाऊस आहे. मागील काही दिवसांपासून त्याठिकाणी छतावर अनधिकृतपणे सज्जाचे वाढीव बांधकाम सुरु होते. शुक्रवारी सकाळी त्याठिकाणी सज्जाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याखालील बांबूचा आधार काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी एका ठिकाणचा सज्जा निखळून कोसळल्यामुळे त्याखाली दुर्गा सहानी हा ३० वर्षीय मजूर अडकला होता. सदर घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दल, महापालिका आपत्कालीन यंत्रणा व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अथक प्रयत्नानंतर स्लॅबचा कोसळलेला भाग कापून त्याखाली अडकलेल्या मजुराला बाहेर काढण्यात आले. परंतु सिमेंटच्या सज्ज्याखाली मान व दोन्ही हात अडकून चिरडल्यामुळे त्यात दुर्गाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी महापालिका विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी रो हाऊस मालक भटनागर व ठेकेदार हेमंत सहानी यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)