Join us

१३ हेक्टरवरील कांदळवनाची बुलेट ट्रेनसाठी कत्तल - रावते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:44 AM

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील १३. ३६ हेक्टर क्षेत्रावरील तब्बल ५४ हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली.

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील १३. ३६ हेक्टर क्षेत्रावरील तब्बल ५४ हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली.शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. खारफुटी तोडणीसाठी किनारा क्षेत्र प्राधिकारणाने परवानगी दिल्याचे मंत्री रावते यांनी स्पष्ट केले. बुलेट ट्रेनचा प्रकल्प उंच खांबांवरून प्रस्तावित असल्यामुळे खारफुटीची तोड कमी प्रमाणात होईल त्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होणार नाही. नवी मुंबई क्षेत्रात खारफुटीची तोड करण्यात येणार नाही. त्यामुळे पुराचे पाणी नवी मुंबई शहरात घुसण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. खारफुटीच्या तोडणी नंतर एकास पाच या प्रमाणात खारफुटीची लागवड केली जाणार नसल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादनाबाबत शरद रणपिसे यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात रावते यांनी १३७९ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले. त्यापैकी खासगी मालकीची गुजरातमध्ये ७२४.१३ तर महाराष्ट्रात २७०.६५ हेक्टर जमीन आहे. राज्यात पालघर जिल्ह्यात ३४९८ कुटुंबे व ठाणे जिल्ह्यातील ६५८९ व्यक्ती प्रकल्पबाधित होणार आहेत. मुंबईतील विक्रोळीतील ३९.२५२ चौमीची खासगी जागा वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील १८८ हेक्टर खासगी जागा संपादित होणार असून खासगी वाटाघाटीमार्फत २.९५ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबईबुलेट ट्रेन