‘त्या’ विषप्रयोग झालेल्या नारळाच्या झाडाची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:20 AM2019-04-25T02:20:35+5:302019-04-25T02:20:40+5:30
बोरीवली पूर्वेकडील राजेंद्र नगरील ओम साई सोसायटी येथील चार नारळांच्या झाडांवर जानेवारी महिन्यात विषप्रयोग झाला होता.
मुंबई : बोरीवली पूर्वेकडील राजेंद्र नगरील ओम साई सोसायटी येथील चार नारळांच्या झाडांवर जानेवारी महिन्यात विषप्रयोग झाला होता. झाडांच्या खोडाला ड्रिल करून त्यात रासायनिक पदार्थ टाकून विषप्रयोग झाल्याची तक्रार कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली होती. परंतु याच्या पाठीमागे कोण आहे? याचा तपास अजूनही लागलेला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चार झाडांपैकी एक नारळाचे झाड तोडले.
स्थानिक रहिवासी अनिल कदम यांनी यांसदर्भात सांगितले की, १६ एप्रिल रोजी महापालिकेचे अधिकारी झाडे तोडण्यासाठी आले होते. महापालिकेकडून दोन पत्र लावण्यात आली आहेत. त्यापैकी एकावर टॅम्प आहे आणि दुसºयावर टॅम्प नाही. तिन्ही झाडे धोकादायक असून ती तोडायची आहे, असे अधिकाºयाने सांगितले. परंतु तिघापैकी एक नारळाचे झाडे तोडले. अधिकाऱ्यांकडे झाडे तोडण्याची परवानगी नव्हती. पोलिसांना फोन करतो, असे म्हटल्यावर ते पळून गेले. त्यांना अडविले नसते तर तिन्ही झाडे तोडली गेली असती.
महापालिका आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर म्हणाले की, झाडे तोडण्याची परवानगी आर/मध्य विभागाकडून देण्यात आली नव्हती. झाडे तोडण्याची परवानगी इथून दिली जात नाही. कदाचित, नारळाचे झाड संपूर्ण वाळलेले असल्यामुळे त्याला धोकादायक घोषित केले असेल. तसेच कोणाच्या घरावर झाड पडू नये, यासाठी तोडण्यात आले असावे.