Join us

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी १ हजार ८२८ झाडांची कत्तल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 8:39 AM

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे मुंबई ते अहमदाबाददरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम सुरू आहे.

मुंबई :

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे मुंबई ते अहमदाबाददरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम सुरू आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गात वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळ फाट्यापर्यंत २१ किमीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. या भुयारी बोगद्याचे काम करताना येथील भूखंडावरील १ हजार ८२८ झाडांचे नुकसान होणार आहे. त्यापैकी १ हजार ६८७ झाडे तोडून १४१ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. झाडांची नुकसानभरपाई म्हणून एनएचएसआरसीएसद्वारे ५ हजार ३०० झाडे लावण्यात येणार आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सुरुवातीचे वांद्रे- कुर्ला संकुल हे स्थानक भूमिगत स्वरूपात बांधले जाणार आहे, तसेच २१ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. त्यापैकी ७ किमी लांबीचा बोगदा समुद्राखाली असणार आहे. बोगद्याच्या कामानिमित्त विक्रोळी ३.९२ हेक्टर क्षेत्रातील एकूण १ हजार ८२८ झाडे तोडण्यात येणार आहेत. या झाडांच्या बदल्यात ५ हजार ३०० झाडे लावण्याचा निर्णय नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे.

३.९२ हेक्टर भूखंडापैकी २ हेक्टरवर ट्रॅक्शन सबस्टेशन आणि डिस्ट्रिब्युशन सबस्टेशनच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. या परिसरातील एकूण झाडांची संख्या १ हजार २४३ इतकी आहे. बांधकाम क्षेत्रात १.९ हेक्टर जागेत बोगद्याच्या कामासाठी आणि वायुविजनासाठी इमारत बांधण्यात येणार आहे. या परिसरात एकूण ५८५ झाडे आहेत. ही झाडे तोडण्यात येणार असून, यापैकी १४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, तसेच वन विभागामार्फत ५,३०० झाडे लावणार आहेत.

टॅग्स :बुलेट ट्रेन