मालाडमध्ये आग लावून तिवरांची कत्तल; समाजकंटकांकडून आगी लावण्याचा प्रकार, कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:30 PM2023-07-31T15:30:10+5:302023-07-31T15:30:30+5:30
मालाड येथे माइंडस्पेस मागील रस्त्यालगतच्या तिवरांना आगी लावण्यात आल्या. या जागेवर झोपड्या उभारण्याच्या कटाचा हा भाग असावा.
मुंबई : मालाड मालवणी येथे काही समाजकंटकांकडून तिवरांना आगी लावण्याचे प्रकार घडत असून याबाबत संबंधित विभागांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मानव जोशी यांनी मुख्यमंत्री तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
मालाड येथे माइंडस्पेस मागील रस्त्यालगतच्या तिवरांना आगी लावण्यात आल्या. या जागेवर झोपड्या उभारण्याच्या कटाचा हा भाग असावा. अथवा या जागेचा डम्पिंग ग्राउंडसारखा वापर करीत त्या जागेत बांधकामाचे डेब्रिज टाकण्यासाठी बिल्डरांकडून हे प्रकार केले गेले असावेत, अशा संशय मानव जोशी यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे.
तिवरांची कत्तल होऊन रिकाम्या झालेल्या जागेत झोपड्या उभ्या राहतील अथवा बेकायदेशीर धंदे वसवले जातील. झोपडीदादांनी वसवलेल्या या झोपड्यांमुळे या भागात गलिच्छपणा वाढून, पाणी तुंबून डास वाढतील. त्यामुळे आगी लावण्याच्या प्रकारांची गंभीर दखल घेत हे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तिवरांची जंगले असलेल्या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नियमितपणे सॅटेलाईट फोटोग्राफी करण्यात यावी, असे उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तिवर संरक्षक समितीने ठरवले होते. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.