शिल्पा शेट्टीच्या काकांकडूनही तिवरांची कत्तल
By admin | Published: September 13, 2016 05:26 AM2016-09-13T05:26:19+5:302016-09-13T05:26:19+5:30
कपिल शर्माने बंगल्यासाठी तिवरांची कत्तल केल्याची बाब ताजी असताना आता शिल्पा शेट्टीच्या काकांनी देखील अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे
मनोहर कुंभेजकर , मुंबई
कपिल शर्माने बंगल्यासाठी तिवरांची कत्तल केल्याची बाब ताजी असताना आता शिल्पा शेट्टीच्या काकांनी देखील अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र शेट्टी यांच्या सायसा बंगला क्रमांक १०/८७ मध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप ‘वॉच डॉग फाउंडेशन’ने केला आहे. सुरेंद्र शेट्टी यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती फाउंडेशनचे संचालक निकोलस अल्मेडा, गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.
कपिल शर्मा आणि सुरेंद्र शेट्टी यांनी बंगल्याच्या बांधकामासाठी सुमारे ६० चौरस मीटर तिवरांच्या जंगलांची कत्तल केल्याचे आढळले. शिवाय बंगल्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकल्याचे वनविभागाच्या पाहणीत आढळले, असे वॉच डॉगने म्हटले आहे.
वनसंवर्धक अधिकारी बोडसे आपला अहवाल एन. वासुदेवन यांना सादर करणार आहेत. जर शासनाने यावर काही कारवाई केली नाही, तर आम्ही हरित लघुवाद न्यायालयाकडे दाद मागू, असेही ‘वॉच डॉग फाउंडेशन’ने म्हटले आहे. तिवरांची कत्तल करणाऱ्या कपिल शर्मा आणि सुरेंद्र शेट्टी यांच्यावर अनधिकृत भरणी-बांधकाम व तिवरांच्या तोडणीबाबत पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये आणि अनधिकृत गौणखनिज भराव अंतर्गत कलम ४८ (७) व (८) नुसार कपिल शर्मा आणि सुरेंद्र शेट्टी यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.