शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी झोप महत्त्वाचा घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:16+5:302021-03-19T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील वर्षभरात लॅकडाऊनमुळे अनेक नागरिकांना निद्रानाशाच्या त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी, यामुळे काही जणांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील वर्षभरात लॅकडाऊनमुळे अनेक नागरिकांना निद्रानाशाच्या त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी, यामुळे काही जणांना निद्रानाशाच्या गंभीर समस्यांवर उपचार घ्यावे लागले तर काही जणांचे बिघडलेले झोपेचे गणित अजूनही जुळलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी झोप हा सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
अपुऱ्या झोपेमुळे मेंदू झोपेत जागा राहण्याचे, मोबाईल फोबियासह झोपेत श्वास थांबणे, झोपेत फिट येणे, काही काळासाठी स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा, दिवसा थकल्यासारखे वाटणे, झोपेतून उठताना थकवा जाणवणे, झोपेत लघवी करणे असे आजार होतात. विषाणू हे सूक्ष्मजीवी असतात. त्यांच्यात डीएनए आणि आरएनएचे प्रकार असतात; परंतु पुनरुत्पादनासाठी कोणतीही प्रजाती नसते. प्रजातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पुनरुत्पादन हे सजीवांचे
लक्षण आहे. विषाणू हे त्यांच्या पुनरुत्पादनासाठी दुसऱ्या जीवांवर अवलंबून असतात. विषाणू व्यक्तींच्या ज्या पेशींमध्ये संक्रमण करतात, ती पेशी विषाणूंच्या पुनरुत्पादनामुळे नष्ट होतात. विषाणू संक्रमित पेशीत बदल झाला नाही तर त्या व्यक्तीवर विषाणूंच्या संसर्गाचा परिणाम होत नाही, परिणामी तो आजारी पडत नाही. मात्र, संक्रमित पेशी नष्ट होत असतील तर व्यक्ती गंभीर आजारी पडतो, हाच प्रकार कोरोना विषाणूच्या संदर्भात सुरू आहे, असे निरीक्षण डॉ. सुशांत गर्दे यांनी मांडले. निद्राविकार शंभरहून अधिक प्रकारचे आहेत. ४४ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया घोरण्याच्या आजाराने त्रस्त आहेत, हे विशेष. आयुष्यातील ३३ टक्के वेळ झोपण्यात जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ‘जागतिक निद्रा दिन’ साजरा करण्यात येतो, या निमित्त दैनंदिन आय़ुष्यातील झोपेचे महत्त्व अधोरेखित कऱण्यासाठी दरवर्षी एका संकल्पनेवर भर देऊन त्याविषयी जनजागृती करण्यात येते. यंदा ‘नियमित झोप, सुदृढ भविष्य’ ही संकल्पना असून या माध्यमातून निरोगी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी झोप महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात येतो.
झोपेचे तंत्र
झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितींमधून प्रवास करतो. डोळ्यांची हालचाल न होता घेतली जाणारी झोप ही ७० मिनिटांची असते. याला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप’ म्हणतात. डोळ्यांच्या हालचालींसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते. अशाप्रकारे झोपेचे एक चक्र सुमारे ९० मिनिटांचे असते. अशी चार चक्रे असतात. या चक्रांची दिशा योग्य असेल तर झोपेनंतर विषाणूंशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.