पाण्याने उडवली झोप
By admin | Published: May 25, 2015 02:41 AM2015-05-25T02:41:47+5:302015-05-25T02:41:47+5:30
पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च करते. मात्र आजही चेंबूरमधील काही भागांत पाण्याची मोठी
मुंबई : पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च करते. मात्र आजही चेंबूरमधील काही भागांत पाण्याची मोठी समस्या असताना पालिका प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना रात्रभर जागून पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या रहिवाशांना भेडसावत होती. हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने करोडो रुपयांचा निधी खर्च करून पाण्याची समस्या कायमची कमी करण्याच्या प्रयत्न केला आहे. चेंबूरच्या शंकर नगर परिसरात देखील अशीच परिस्थिती गेल्या १० वर्षांपासून आहे. या परिसरात एकूण ५०० ते ६०० घरांची लोकवस्ती आहे. मात्र यातील ३०० घरांना २४ तास मुबलक पाणीपुरवठा होतो आणि बाकीच्या ३०० घरांना रात्रभर जागून पाणी भरावे लागत आहे.
या परिसरात अनेक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन आहे. ही लाइन खराब झाल्याने या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिकेने बाजूच्याच परिसरातून पाइपलाइन येथे टाकावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील स्थानिक रहिवाशांची आहे. यासाठी स्थानिक रहिवासी दयानंद पुजारी यांनी पालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे अनेक अर्ज केले आहेत. मात्र अर्जानंतर अधिकारी पाहणी करून जातात, पण नंतर तिकडे फिरकत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. (प्रतिनिधी)