सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:04 AM2018-02-23T03:04:58+5:302018-02-23T03:05:00+5:30

मुंबईतील प्रमुख जलवाहिन्या अतिक्रमणमुक्त करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सायकल ट्रॅक तयार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

Slice the billions for bicycle tracks | सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधींचा चुराडा

सायकल ट्रॅकसाठी कोट्यवधींचा चुराडा

Next

मुंबई : मुंबईतील प्रमुख जलवाहिन्या अतिक्रमणमुक्त करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सायकल ट्रॅक तयार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात मुलुंड ते अंधेरी सहार रोडपर्यंत १४.१० कि.मी. पट्टयात सायकलचा ट्रॅक उभारण्यात येणार आहे. मात्र मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने उभारलेले सायकल ट्रॅक फेल गेल्यानंतरही पुन्हा सायकल ट्रॅकच्या पालिकेच्या अट्टाहासाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबईतील प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूचे अतिक्रमण हटवून त्या संरक्षित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने ८० ते ९० टक्के जलवाहिन्यांच्या बाजूची अतिक्रमणे हटवली आहेत. जलवाहिन्यांच्या दुतर्फा टप्प्याटप्प्याने ३६ किलोमीटरपर्यंत हा सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. यासाठी जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूला दहा मीटर जागा ठेवण्यात आली आहे. सायकल ट्रॅक हा डांबरी असेल त्याचबरोबर सायकल स्टॅण्डही असणार आहे, तर मातीचा जॉगिंग ट्रॅकही तयार करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ४८८ कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला आहे. सायकल आणि जॉगिंग ट्रॅकबरोबरच जलवाहिन्यांचा वापर कॅनव्हास म्हणून करण्यात येणार आहे. तेथे नवोदित कलाकारांना त्यांच्या चित्रकलेचे नमुने सादर करता येणार आहेत. मात्र एमएमआरडीएच्या सायकल ट्रॅकच्या अपयशानंतर पालिकेच्या सायकल ट्रॅकचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.

Web Title: Slice the billions for bicycle tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.