लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मुंबईत गेले दोन दिवस घट दिसून आली होती. सलग दोन दिवस सहा महिन्यांतील सर्वात कमी दैनंदिन रुग्णवाढीची नोंद होत होती. मात्र, बुधवारी ६४४ बाधित रुग्ण सापडले आहेत, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०८ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ८४४ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २६ हजार २८४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख ५६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ५७३ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ८१६ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ३१ हजार ९४४ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७३ लाख ८५ हजार ६८१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.