मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते ११ हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवारी ५२९ तर मंगळवारी ५७५ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात दिवसभरात वाढ झाली आहे. ८३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १३०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, तो ७२७ दिवसांवर पोहचला आहे.
मुंबईत दिवसभरात ८३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख १८ हजार ५१३ वर पोहचला आहे. बुधवारी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५ हजार २२७ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ८६ हजार १५२ वर पोहचली आहे.
मुंबईत सध्या १४ हजार ९०७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ७२७ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २० चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८० इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी २९ हजार ५८८ तर, आतापर्यंत एकूण ६६ लाख ९३ हजार ९१० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.