मुंबईत किंचित गारवा; राज्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:03 AM2021-02-19T04:03:57+5:302021-02-19T04:03:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्याचा समावेश असून, १९ फेब्रुवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईचे किमान आणि कमाल तापमान स्थिर आहे. हवामानात किंचित गारवा आहे. परिणामी अजूनही मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि लगतच्या भागावरील चक्रवात आता दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर आहे. उत्तर कर्नाटक ते विदर्भावर असलेला चक्रीय चक्रवातापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा आता केरळ किनारपट्टी-कर्नाटक-दक्षिण मध्य महाराष्ट्रावर आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
* राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
मुंबई २०.२, पुणे १६.७, जळगाव १६.५, कोल्हापूर १८.५, महाबळेश्वर १४.१, मालेगाव १७.८, नाशिक १६, सातारा १८.४, सोलापूर २०.६, औरंगाबाद १७, परभणी १८.५, नांदेड १७, अकोला १७.६, अमरावती १६.६, बुलडाणा १७.८, चंद्रपूर १६.६, गोंदिया १५, नागपूर १६.६, वाशिम १६.२, वर्धा १७.५
.................