Join us  

बुटात आलेले चप्पल घालून गेले!

By admin | Published: March 31, 2017 6:56 AM

राज्यातील गुरव समाजाने विविध मागण्यांसाठी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

मुंबई : राज्यातील गुरव समाजाने विविध मागण्यांसाठी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांची पुरती पंचाईत झाली. व्यासपीठावर जाताना काढलेले बूट बदली झाल्याने कोकीळ यांना कार्यकर्त्याची चप्पल घालून काढता पाय घ्यावा लागला.देवस्थान इनाम वर्ग ३ जमिनीवरील हक्कावरून गुरव समाजाच्या अखिल गुरव समाज संघटनेने आझाद मैदानात मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन केले. गुरव समाजाच्या प्रमुख मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ आझाद मैदानावरील व्यासपीठावर धडकले. गुरव समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकद पणाला लावेल, असे आश्वासित करत सुटकेचा नि:श्वास टाकण्याचा सल्लाही कोकीळ यांनी आंदोलनकर्त्या गुरव समाजाला दिला. स्वागत-सत्कार स्वीकारल्यानंतर पुढील बैठकीसाठी रवाना होण्यासाठी व्यासपीठावरून खाली उतरलेल्या कोकीळ यांचे कार्यकर्ते बुटाची शोधाशोध करू लागले. मात्र बूट सापडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर खुद्द कोकीळही बुटाचा शोध घेऊ लागले. कोकीळ यांची व्यथा पाहून संघटनेच्या कार्यकर्त्याने माईकवरून बुट बदली झाले असल्याने परत करण्याचे आवाहन केले. मात्र त्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पायातील मोजे काढून चप्पल घालण्याचा सल्ला एका कार्यकर्त्याने दिला. पुढील बैठकीला उशीर होत असल्याने कोकीळ यांनीही मागचा-पुढचा विचार न करता कार्यकर्त्याची कोल्हापुरी चप्पल घालून संघटनेचा निरोप घेतला. (प्रतिनिधी)कोकीळ परतलेएकंदरीतच हवालदिल झालेल्या समाजाला आश्वासित करण्यासाठी आलेल्या कोकीळ यांनाच हवालदिल होऊन परतावे लागल्याची चर्चा आझाद मैदानात जमलेल्या गुरव समाजात होती.