Join us

‘बेटी बढाओ’ हा नारा आवश्यक - राज्यपाल

By admin | Published: February 20, 2016 2:11 AM

महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासोबतच ‘बेटी बढाओ’ हा नारा समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.

मुंबई : महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासोबतच ‘बेटी बढाओ’ हा नारा समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.पेडर रोड येथील फिल्म्स डिव्हिजन येथे महिलांबाबत असलेल्या पहिल्या ‘फ्लो फिल्म फेस्टिव्हल’चे राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिनेत्री सोनम कपूर, ‘फ्लो’च्या राष्ट्रीय अध्यक्ष अर्चना गुप्ता, मुंबई अध्यक्ष फाल्गुनी पाडोडे, फिल्म डिव्हिजन मुंबईचे महासंचालक मुकेश शर्मा आदी उपस्थित होते.राज्यपाल म्हणाले, महिलांविषयी असलेल्या गैरसमजांबाबत मतपरिवर्तन करण्यामध्ये चित्रपटांचे मोठे योगदान आहे. शासनानेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध पावले उचलली आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाबाबत प्रयत्न होत आहेत. बाळंतपण म्हणजे महिलांसाठी पुनर्जन्मच असतो. त्यामुळे त्यांना बाळंतपणासाठी त्यांच्या सोयीनुसार हॉस्पिटल निवडण्याचा अधिकार मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.मुख्यमंत्री म्हणाले, चित्रपट हे संवादाचे उत्तम माध्यम आहे. चित्रपटाचा परिणाम समाज, मानवी मनावर मोठ्या प्रमाणात होत असतो. राज्य सरकारनेही महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘बचत गट मॉल्स’ ही संकल्पना राबविली आहे. याचा उद्देश बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा आहे. हे बचत गट मॉल्स प्रत्येक जिल्हा पातळीवर, प्रत्येक तहसील क्षेत्रात तसेच नगरपालिका क्षेत्रापर्यंत पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाले तर त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. महिलांसाठीच्या इंडस्ट्रियल पार्कबाबतही सरकारचे काम सुरू आहे. या क्षेत्रामध्ये जर फ्लो संघटनेला सरकारसोबत काम करायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. झोपडपट्टी भागात महिलांच्या नावाने घराची मालकी किंवा महिला व पती अशा स्वरूपात घराची मालकी करण्याबाबतही सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)