‘त्या’ वृद्धेची हत्या करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:18 AM2018-06-20T02:18:27+5:302018-06-20T02:18:27+5:30
गुजरातमध्ये गेल्या वर्षी एका वृद्धेची हत्या करून पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या वांद्रे परिसरातून मंगळवारी आवळण्यात आल्या.
मुंबई : गुजरातमध्ये गेल्या वर्षी एका वृद्धेची हत्या करून पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या वांद्रे परिसरातून मंगळवारी आवळण्यात आल्या. त्या वृद्धेच्या जावयानेच ही सुपारी दिल्याचे चौकशीत उघड झाले, तेव्हापासून मारेकरी फरार होता.
इस्तीयाक हसनअली खान (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जोगेश्वरीच्या वांद्रे प्लॉटमध्ये खान लपल्याची माहिती क्राइम ब्रांचच्या कक्ष १० चे सहायक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि पोलीस हवालदार गवेकर यांना मिळाली. त्यानुसार, या कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. जवळपास २४ तास सलग पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवत, १९ जूनला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये रंभादेवी पटेल (८०) या महिलेची गळा दाबून हत्या करत, त्यांच्या अंगावरचे ५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी तपास करत, घटलोडिया पोलिसांनी पटेल यांचा जावई रमेश पटेल आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली होती.
मात्र, सुपारी घेणारा खान फरार होता. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. मुंबई क्राइम ब्रांचला या प्रकरणी फरार आरोपीला पकडण्यात यश आले. घटलोडिया याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.