मध्य रेल्वेवर सरकत्या जिन्यांचा वर्षाव
By admin | Published: January 3, 2017 06:03 AM2017-01-03T06:03:23+5:302017-01-03T06:03:23+5:30
मध्य रेल्वेवर नव्या वर्षात सरकते जिने आणि लिफ्टचा वर्षाव केला जाणार आहे. १५ सरकते जिने बसवण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती
मुंबई : मध्य रेल्वेवर नव्या वर्षात सरकते जिने आणि लिफ्टचा वर्षाव केला जाणार आहे. १५ सरकते जिने बसवण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. सरकत्या जिन्यांबरोबरच १८ लिफ्टही याच वर्षात बसवण्याचे नियोजन आहे.
वृद्ध प्रवासी, गरोदर महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकातील पादचारी पूल चढताना आणि उतरताना बराच त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून सुटका करण्यासाठी सरकते जिने व लिफ्ट बसवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. मध्य रेल्वेवर दादर, ठाणे, कल्याणसह काही स्थानकांत सरकते जिने बसवण्यात आल्यानंतर प्रवाशांकडून त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला. या प्रतिसादानंतर सरकत्या जिन्यांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे. मेन लाइनवरील दादर स्थानकात ४, घाटकोपर, कल्याण, लोणावळा स्थानकात प्रत्येकी दोन, ठाणे स्थानकात ४ आणि टिटवाळा स्थानकात एक सरकता जिना बसवण्यात येईल. याची निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर प्रवाशांना सोयीस्कर लिफ्टही बसवण्यात येतील. सीएसटी, ठाणे व कल्याण स्थानकातील लिफ्टनंतर आणखी १८ लिफ्ट बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दादर स्थानकात ६, सीएसटी, घाटकोपर, डोंबिवली, लोणावळ्यात प्रत्येकी दोन, ठाणे स्थानकात ३ आणि एलटीटीमध्ये एक लिफ्ट बसवण्यात येईल.