कोरोना संक्रमणामुळे उद्दिष्टपूर्तीत अडथळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरांतील दळणवळण सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी कामे शहरांत सुरू असून कोरोना संक्रमणामुळे या कामांना अपेक्षित प्रगती साध्य करता आलेली नाही. नोव्हेंबर,२०१९ ते नोव्हेंबर,२०२० या एका वर्षात प्रमुख कामांमध्ये झालेल्या प्रगतीचा आलेख मांडल्यास प्रकल्पांचा आस्ते कदम वाटचाल अधोरेखित होते.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शिवडी न्हावाशेवा या महत्त्वाकांक्षी ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची पाहणी केली. गेल्या वर्षी या प्रकल्पाचे काम १७ टक्के पूर्ण झाले होते. ते आता ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा दावा एमएमआरडीएकडून केला जात असला तरी पुढील २२ महिन्यांत ६५ टक्के काम मार्गी लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. कलानगर उड्डाणपूल हा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा असून कोरोना संक्रमण काळातील पहिले तीन महिने वगळल्यास हे काम वेगाने सुरू आहे. वर्षभरात जवळपास ४० टक्के काम पूर्ण करण्यात आले असून आता जेमतेम २० टक्के काम शिल्लक आहे. पुढल्या चार महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे काम ४९ टक्क्यांवरून ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, या मार्गिकेच्या कारशेडच्या मार्गातील विघ्न आजही कायम आहे. त्यामुळे पुढील दीड वर्षात मेट्रोचे काम पूर्ण झाले तरी कारशेडअभावी ही मेट्रो प्रवाशांना सेवा देऊ शकणार नाही.
अंधेरी-दहिसर या मार्गावरील मेट्रो ७ आणि डी.एन. नगर ते दहिसर या मार्गावरील मेट्रो २ अ येत्या मे महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. मेट्रोचे हे काम ८३ टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कामाची प्रगती ७३ टक्क्यांपर्यंत होती. मेट्रो २चे काम ७४ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. बेजबाबदार कंत्राटदारामुळे डी.एन. नगर ते मानखुर्द या मार्गावरील मेट्रो २चे काम गेले आठ महिने बंद आहे. त्यामुळे या कामाची प्रगती दोन वरून तीन टक्क्यांवरच पुढे सरकली आहे. वडाळा कासरवडवली या मेट्रो ४चे कामही संथगतीने सुरू असून ती प्रगती ११ वरून १८ टक्क्यांवर आली आहे. लोखंडवाला विक्रोळी या मार्गावरील मेट्रो कामाची धाव ९ वरून २१ टक्क्यांवर गेली आहे. तर, मेट्रो ७ अ आणि ९ या मार्गावरील कामे याच वर्षी सुरू झाली असून त्यांनी ६ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.