कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम धीम्या गतीने
By admin | Published: June 27, 2015 11:46 PM2015-06-27T23:46:54+5:302015-06-27T23:46:54+5:30
वाडा तालुक्यातील कुडूस शासकीय आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने परिसरातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
कुडूस : वाडा तालुक्यातील कुडूस शासकीय आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने परिसरातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
कुडूस हे ५२ गावांचे मुख्य केंद्र आहे. गरीब व गरजू रूग्णांना कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा चांगला आधार आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत मोडकळीस आल्याने तीन वर्षापूर्वी पाडण्यात आली व त्या जागेत तीन वर्षापासून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, ते अत्यंत धीम्या गतीने पुढे जात असल्याने रुग्णांची मात्र, हेळसांड होते आहे. तीन पेक्षा अधिक रुग्ण दाखल करण्यास येथे जागा नाही. तर बाळंतपणासाठी येणाऱ्या स्त्रियांसाठी पुरेशी जागा नाही.
पावसाळा सुरू झाल्याने विंचूदंश, सर्पदंश व अन्य आजारांचे रूग्ण वाढत असून येथील जागा अपुरी पडत आहे. अनेक रूग्णांना जागेअभावी खाजगी रूग्णालयात दाखल होऊन महागडी सेवा घ्यावी लागते.
येथील आरोग्य अधिकारी निकाळजे यांनी सांगितले की, जागेअभावी रूग्णांना वाडा ग्रामीण रूग्णालयात पाठविले तर तेथेही जागेअभावी हेळसांड होत असल्याने काही रूग्ण परस्पर घरी जातात. परिणामी, आजार बळावतो. रूग्णसंख्या व जागेची अडचण लक्षात घेवून आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे रेंगाळलेले काम गतीने पूर्ण करावे अशी मागणी येथील मुस्तफा मेमन व प्रा. धनंजय पष्टे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
(वार्ताहर)