मुदत संपण्यापूर्वी गाळ काढला नाहीतर कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना मिठी नदीत घालणार अंघोळ!
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 22, 2025 19:41 IST2025-04-22T19:37:58+5:302025-04-22T19:41:09+5:30
मनसेने प्रतिकात्मक मुलांच्या खेळण्यातील जेसीबी आणि डंपर आणून नदीतील गाळ काढला.

मुदत संपण्यापूर्वी गाळ काढला नाहीतर कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना मिठी नदीत घालणार अंघोळ!
मुंबई-अंधेरी ( पूर्व),मरोळ परिसरातील मिठी नदीतील गाळ आणि डेब्रिज पाहून मनसे आज आक्रमक झाली. मनसेने प्रतिकात्मक मुलांच्या खेळण्यातील जेसीबी आणि डंपर आणून नदीतील गाळ काढला.
जर मुदत संपण्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढला नाही तर मनसे कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना मिठी नदीत आंघोळ घालणार असल्याचा ठोस इशारा मनसेचे अंधेरी (पूर्व )विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी पालिका प्रशासनाला दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसापूर्वी मुंबईतील नद्या आणि नाल्यांच्या साफसफाई चे काम सुरू आहे. पालिकेकडून साफसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी होतील असा दावा करण्यात आला आहे.मात्र अंधेरी ( पूर्व) मरोळ परिसरात मिठी नदीच्या गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराकडून धिम्या गतीने सुरू आहे.
आज मनसेने अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांच्या शिष्टमंडळाने येथील मरोळ परिसरातील मिठी निधीची पाहणी केली. दरवर्षी मिठी नदीच्या सफाईचे काम हे कागदावरच पूर्ण होत असते, मिठी नदी साफ न झाल्यामुळे अंधेरी परिसरात पूर येण्याची शक्यता असते.त्यामुळे पालिकेच्या डेडलाईन पूर्वी मिठी नदीतील गाळ आणि टाकलेले डेब्रिज उचलले न गेल्यास संबंधित कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांना आणून मिठी नदीत अंघोळ घालणार आणि त्यांच्या हाताने हा गाळ त्यांना काढायला लावणार असा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.