मध्य रेल्वे मार्गावर कल्व्हर्टमधील गाळ काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 01:14 PM2021-06-06T13:14:53+5:302021-06-06T13:16:18+5:30
Central Railway News: पावसाळ्यापूर्वी तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची, रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील गाळ काढण्याची कामे रेल्वेकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू नये, यासाठी हे काम महत्वाचे ठरते.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंड दरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांची स्वच्छता करून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विनंती केल्यानंतर ही कामे मुंबई महापालिका प्रशासनाने अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केली आहेत.
पावसाळ्यापूर्वी तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची, रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील गाळ काढण्याची कामे रेल्वेकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू नये, यासाठी हे काम महत्वाचे ठरते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाला आढावा बैठकीत विनंती केली. रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी यंत्रसामग्री नसल्याकारणाने त्यांनी महापालिकेला रेल्वे हद्दीत हे काम करण्यासाठी विनंती केली.
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. पैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१. मध्य रेल्वे मार्गावर ५३. हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत.
असे झाले काम
पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करून १८ पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.
येथे झाली सफाई
कर्नाक बंदराखाली
भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ
करी रोड ते परळ दरम्यान
परळ ते दादर दरम्यान जगन्नाथ भातमकर पुलाखाली
दादर ते माटुंगा दरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ
माटुंगा ते शीव (सायन) दरम्यान
शीव ते कुर्ला दरम्यान
कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ
कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ
भांडुप ते नाहुर दरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला
मुलुंड ते ठाणे दरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला
येथे वापरले जात आहे मनुष्यबळ
विद्याविहार ते घाटकोपर दरम्यान जॉली जिमखाना लगत
विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान विक्रोळी स्थानकाजवळ
कांजूरमार्ग ते भांडुप दरम्यान दातार नाला
या तीन ठिकाणी संयंत्र पोहोचू शकत नसल्याने स्वच्छतेचे काम मनुष्यबळ नेमून केले जात आहे.
१५ दिवस लागले
१९ मे रोजी सुरू झालेली ही कार्यवाही ४ जून रोजी पूर्ण झाली आहे. अवघ्या १५ दिवसात महानगरपालिकेने जबाबदारी पार पाडली आहे.